एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2024 08:23 PM2024-09-22T20:23:01+5:302024-09-22T20:23:31+5:30
Bharat Gogawale news: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत महायुतीत गेलेल्या शिवसेनेच्या आमदारांपैकी अनेकजण मंत्रिपदासाठी गुढघ्याला बाशिंग बांधून होते.
शिंदे गट शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी मंत्रिपदासाठी शिवलेला कोट तसाच पडून राहण्याची चिन्हे आहेत. काही दिवसांपूर्वी गोगावले यांना एसटी महामंडळाचे अध्यक्षपद जाहीर करण्यात आले होते. परंतू, गोगावलेंनी निवडणुकीच्या तोंडावर ते नाकारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत महायुतीत गेलेल्या शिवसेनेच्या आमदारांपैकी अनेकजण मंत्रिपदासाठी गुढघ्याला बाशिंग बांधून होते. परंतू, तेवढ्यात अजित पवार गट येऊन धडकल्याने भाजपा-शिंदे सेनेत वाटलेली अर्धी अर्धी भाकरी देखील तिघांमध्ये वाटावी लागली. यामुळे विदानसभा निवडणूक महिन्यावर आलेली असतानाही शिंदे गटाच्या इच्छुकांना मंत्रिपद मिळाले नाही. मंत्रिमंडळाचा विस्तारच नाही तर महामंडळेही दिली गेली नाहीत. यामुळे ही नाराजी दूर करण्यासाठी गोगावलेंना गेल्याच आठवड्यात एसटी महामंडळाचे अध्यक्षपद देण्यात आले होते.
परंतू नाराज असलेल्या गोगावलेंनी विधानसभा निवडणूक तोंडावर असताना थोड्या दिवसांसाठी यात का अडकून पडायचे अशी भुमिका घेतल्याने अध्यक्षपदही लांबणीवर पडल्याचे चित्र आहे. एबीपी माझाला दिलेल्या प्रतिक्रियेनुसार थोड्या दिवसांसाठी यामध्ये कशाला अडकून बसायचं, कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून पुढचा निर्णय घेऊ, असे गोगावलेंनी म्हटले आहे.
यामुळे गोगावले अध्यक्षपद नाकारणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. महामंडळ हवे ही आमची मागणी नव्हती. पण मुख्यमंत्र्यांनी मनधरणी केली, तसा जीआर काढला, ऑर्डही निघाली. आम्ही पक्षवाढीसाठी काम करत आहोत. मग थोड्या दिवसांसाठी कशाला यात अडकून पडायचे असा विचार करत आहे. याबाबत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे, असे गोगावलेंनी स्पष्ट केले आहे.