भार्इंदर निवडणूक तारखा उद्या जाहीर?
By admin | Published: July 14, 2017 03:44 AM2017-07-14T03:44:17+5:302017-07-14T03:44:17+5:30
येत्या शनिवारी, १५ जुलैला मीरा-भार्इंदर पालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.
धीरज परब ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा रोड : मतदारयादी तयार करण्याच्या सावळ्यागोंधळामुळे अंतिम यादीची प्रसिध्दी लांबली असताना त्याची वाट न पाहता येत्या शनिवारी, १५ जुलैला मीरा-भार्इंदर पालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली, तर आॅगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात मतदान होण्याची चिन्हे आहेत. मात्र प्रचारासाठी जेमतेम २५ दिवस मिळणार असल्याने उमेदवारांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
प्रभागनिहाय मतदारयाद्या, मतदान केंदे्र आदी तयारीसाठी २ जूनला राज्य निवडणूक आयोगाने पालिकेला कार्यक्रम दिला होता. २५ जूनला प्रारुप प्रभागनिहाय मतदारयादी तयार करणे, १ जुलैपर्यंत हरकती, ७ जुलैला प्रभागनिहाय अंतिम याद्या-मतदान केंद्रांची यादी प्रसिध्द करणे आणि ११ जुलैला प्रभागनिहाय आणि मतदानकेंद्रनिहाय अंतिम मतदारयाद्या प्रसिध्द करणे आवश्यक होते. परंतु मीरा-भार्इंदर व ओवळा-माजीवडा विधानसभा मतदारसंघाच्या नोंदणी अधिकाऱ्यांनी घातलेला घोळ, पालिकेने प्रसिद्ध केलेल्या याद्यांमधील सावळ््यागोंधळामुळे हरकतींची तारीख ४ जुलैपर्यंत वाढवून देण्यात आली. पुन्हा पालिकेने मुदतवाढ घेतल्याने आयोगाने ६ जुलैपर्यंत हरकती-सूचना आणि २० जुलैला प्रभागनिहाय आणि मतदानकेंद्रनिहाय अंतिम यादी प्रसिध्द करण्याचे जाहीर केले. ही अनागोंदी व गैरप्रकार यामुळे संपूर्ण निवडणुकीचे वेळापत्रकच कोलमडून पडले. पण त्यातील नागरिकांच्या सहभागाचे काम पूर्ण झाल्याने यादी आयोगाकडे पाठवण्याची तांत्रिक बाब पूर्ण होईपर्यंत न थांबता निवडणूक कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता आहे.
मीरा-भार्इंदर महापालिकेची महापौर निवडणूक २८ आॅगस्टपर्यंत व्हायला हवी. त्यासाठी किमान दहा दिवस अगोदर मतदान व्हायला हवे. उमेदवारी अर्ज भरण्याचा आठवडा, त्यांची छाननी, पात्र उमेदवारांची यादी, अर्ज मागे घेणे, चिन्ह वाटप आणि अंतिम यादी यासाठी किमान पंधरवडा द्यावा लागतो. नंतर प्रचारासाठी आठ ते दहा दिवसांचा अवधी आणि मतदान, मोजणी यांचा कालावधी पाहता १५ जुलैला आचारसंहिता लागू होण्याची दाट शक्यता आहे.
शेवटच्या दिवशी उमेदवारी स्पष्ट होणार, त्यात प्रभागाचा आकार दुप्पट झाला आहे. त्यांच्या रचनेत बदल झाल्याने, प्रचाराचे दिवस कमी होण्याच्या शक्यतेने उमेदवारांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
>आचारसंहिता लागताच उमेदवारी अर्ज
आचारसंहिता लागू होताच भाजपातील इच्छुकांना उमेदवारी अर्ज वाटले जातील असे भाजपाचे निवडणूक प्रभारी खासदार कपील पाटील यांनी स्पष्ट केले. त्यांच्यासोबत राज्यमंत्री रविंद्र चव्हाण हेही प्रभारी म्हणून काम पाहणार आहेत. पाटील यांनी गुरूवारी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. इच्छउकांची संख्या खूप असल्याने बंडाळीची शक्यता लक्षात घेऊन त्यांनी आपल्याच पक्षाचा महापौर बसवण्यासाठी मेहनत करा, अशी समज उपस्थितांना दिली. पक्षाने प्रत्येक प्रभागात केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे उमेदवारी दिली जाईल, असे पाटील म्हणाले. यावेळी आमदार नरेंद्र मेहता, महापौर गीता जैन, गटनेते शरद पाटील, जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे आदी उपस्थित होते.
>१८ आॅगस्टला मतदान? : १२ व १३ आॅगस्ट रोजी शनिवार-रविवार, तर १५ ला स्वातंत्र्य दिनाची सुट्टी आहे. १७ रोजी पारसी नववर्षाची सुट्टी आहे. २५ पासून गणेशोत्सव सुरू होत आहे. २८ आॅगस्टला सोमवार येत असल्याने महापौरपदाची निवडणूक त्याचदिवशी किंवा २४ आॅगस्टपर्यंत पार पाडावी लागेल. स्वातंत्र्यदिनाच्या बंदोबस्ताच्या दोन दिवसांच्या काळात मतदान होण्याची शक्यता नाही. त्यामुळे १८ आॅगस्टला मतदान होण्याची दाट शक्यता आहे.