भास्कर जाधवांबरोबर जमणे नाही
By admin | Published: October 20, 2014 09:17 PM2014-10-20T21:17:36+5:302014-10-20T22:28:49+5:30
उदय सामंत : वृत्तीला कंटाळूनच राष्ट्रवादीचा त्याग
रत्नागिरी : मला गद्दार म्हणणारे भास्कर जाधव हेच खरे गद्दार आहेत. या विधानसभा निवडणुकीत मला पाडण्यासाठी जाधव यांनी षडयंत्र रचले होते. वेगवेगळ्या समाजातील उमेदवार माझ्या विरोधात उभे करण्याचा डाव त्यांनी रचला होता. अशा व्यक्तिबरोबर पक्षात राहून संघर्ष करण्यात शक्ती वाया घालवण्यापेक्षा पक्षातून नेत्यांना सांगूनच चांगलेपणी बाहेर पडण्याचा निर्णय मी घेतला. जाधव या वृत्तीबरोबर पक्षात राहून काम करणे आपणास शक्य नव्हते, असा हल्लाबोल सेनेचे आमदार, माजी मंत्री उदय सामंत यांनी केला. विधानसभा निवडणुकीत सेनेचे उमेदवार म्हणून विजय झाल्यानंतर कुवारबाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर न्याय भवनाच्या बाहेर ते पत्रकारांशी बोलत होते. आपण पक्ष का सोडला, याची कारणे १९ आॅक्टोबरला देऊ, असे सामंत यांनी सांगितले होते. त्या पार्श्वभूमीवर ते पत्रकारांशी बोलत होते. भास्कर जाधव यांच्यावर त्यांनी जोरदार टीका केली. ते म्हणाले, जाधव यांनी प्रत्येक वेळी पक्षात षडयंत्र रचली. षडयंत्रकारी नेता अशीच त्यांची ओळख आहे. त्याना सेनेत तिकीट मिळाले नाही म्हणून गद्दारी केली. जाधव यांनी चिपळूण पालिका निवडणुकीत वेगळी आघाडी करीत पक्षविरोधी काम केले. तटकरेंच्या निवडणुकीवेळीही षडयंत्र केले. अशा जाधवांना माझ्यावर गद्दारीचा आरोप करण्याचा अधिकारच नाही. अशा माणसाबरोबर पक्षात राहून काम करणे मला मान्य नाही. आपण पक्ष बदलला. मात्र, आपण पक्षांतर करताना वरिष्ठांबाबत कोणतीही टीका करणार नाही, असे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनाही सांगितले होते. सेनेत काम करताना विकासकामांनाच आपण प्राधान्य देणार असल्याचे सामंत म्हणाले. सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याचे प्रवेशकर्तेवेळी दिलेले आश्वासन आपण नक्कीच पूर्ण करू असे ते म्हणाले. सामंत यांनी यावेळी भास्कर जाधव यांच्यावर जोरदार टिका केली व पूर्वी जाहीर केल्याप्रमाणे त्यांनी जाधव यांच्या टिकेला त्यांनी सडेतोड उत्तर दिले. सामंत यांनी विजयी झाल्यानंतर जाधव यांना पत्रकारपरिषदेतून फटकारले आहे. (प्रतिनिधी)