"शिंदे गटात येण्यासाठी भास्कर जाधवांनी तब्बल १०० फोन मुख्यमंत्र्यांना केले होते"
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 08:06 AM2023-02-28T08:06:50+5:302023-02-28T08:07:51+5:30
आज भास्कर जाधव जितके बोलतायेत. तितके तेव्हा तिकीट काढून गुवाहाटीच्या हॉटेलबाहेर बसण्याची आणि जोपर्यंत मला गटात घेत नाही तोवर परतणार नाही अशा बाता करत होते असा दावा फडणवीसांच्या विश्वासूने केला आहे.
मुंबई - मागील जून महिन्यात विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर शिवसेनेत खळबळ माजली. पक्षाचे तत्कालीन गटनेते एकनाथ शिंदे यांनी समर्थक आमदारांसह सूरत गाठली. शिंदे यांनी उद्धव ठाकरेंविरोधात बंडाचा पवित्रा घेतला. त्याला ४० आमदारांनी साथ दिली. ठाकरेंकडे केवळ १५ आमदार उरले. त्यात असलेल्या भास्कर जाधवांबद्दल भाजपा नेत्याने मोठा दावा केला आहे.
भाजपा नेते मोहित कंबोज यांनी भास्कर जाधवांवर बोलताना म्हटलंय की, खिस्यानी बिल्ली खम्बा नोचे ही म्हण भास्कर जाधवांना लागू होते. जून महिन्यात भास्कर जाधवांनी कमीत कमी १०० वेळा एकनाथ शिंदे यांना फोन करून शिंदे गटात येण्यासाठी आग्रह धरला होता. परंतु तिथे असणारे अनेक आमदारांनी भास्कर जाधवांना शिंदे गटात घेण्यास विरोध केला. कारण भास्कर जाधव यांच्यावर विश्वास ठेऊ शकत नाही असं आमदारांचे म्हणणं होते असा दावा त्यांनी केला.
त्याचसोबत आज भास्कर जाधव जितके बोलतायेत. तितके तेव्हा तिकीट काढून गुवाहाटीच्या हॉटेलबाहेर बसण्याची आणि जोपर्यंत मला गटात घेत नाही तोवर परतणार नाही अशा बाता करत होते. तसेच सुनील राऊत हेदेखील भास्कर जाधव यांच्यासोबत सामील होते. भास्कर जाधव यांनी त्यावेळी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंबद्दल काय काय बोलले, कसा त्यांना वेळ दिला नाही हे ते सांगत होते. हे सर्व भास्कर जाधव नाकारू शकतात का? भास्कर जाधवांनी एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांना फोन करून त्या गटात प्रवेश करण्याबाबत विनंती केली होती असं मोहित कंबोज यांनी म्हटलं आहे.
खिस्यानी बिल्ली खम्बा नोचे !@_BhaskarJadhav की सचाई ! pic.twitter.com/rraB413XC2
— Mohit Kamboj Bharatiya (@mohitbharatiya_) February 27, 2023
कोण आहे मोहित कंबोज?
मोहित कंबोज हे भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी होते. कंबोज हे देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू व्यक्ती मानले जातात. राज्यातील सत्तासंघर्ष काळात कंबोज यांचे नाव प्रामुख्याने समोर आले होते. सूरत, गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांसोबत मोहित कंबोज हेदेखील उपस्थित होते. कंबोज यांच्यावर समन्वयाची जबाबदारी देण्यात आली होती. इतकेच नाही तर सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या आमदारांनी कामाख्या देवीच्या दर्शनासाठी आसाम दौरा केला तेव्हाही कंबोज मुख्यमंत्र्यासोबत बोलत असल्याचे फोटो, व्हिडिओ व्हायरल झाले होते.