भास्कर जाधवांचा राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय फसला ?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2020 12:23 PM2020-01-02T12:23:32+5:302020-01-02T12:25:47+5:30
विधानसभा निवडणुकीपूर्वीच जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. जाधव यांचे राष्ट्रवादीत वजन होते. मात्र त्यांनी तरी देखील राष्ट्रवादी पक्ष सोडला. यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते.
मुंबई - प्रदीर्घ काळ लागलेल्या मंत्रीमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त लागला असला तर खातेवाटप अद्याप झाले नाही. त्यामुळे महाविकास आघाडीत सध्या बैठकांचा जोर वाढला आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात मंत्र्यांच्या नावाची घोषणा झाली आहे. मात्र मंत्रीमंडळाच्या यादीत नाव नसणारे शिवसेना नेते नाराज असल्याचे दिसून येत आहे.
आधीच तानाजी सावंत यांना शिवसेनेने जय महाराष्ट्र केले आहे. त्यापाठोपाठ आता राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले भास्कर जाधव नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वीच जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. जाधव यांचे राष्ट्रवादीत वजन होते. मात्र त्यांनी तरी देखील राष्ट्रवादी पक्ष सोडला. यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते.
दरम्यान राज्यातील बदलेली राजकीय स्थिती आणि त्यामुळे तयार झालेले नवीन समिकरणे यामुळे अनेक नेत्यांची गोची झाली आहे. एकमेकांविरुद्ध लढलेल्या नेत्यांना आता सत्तेत राहून जनतेची काम करावी लागणार आहे. शिवसेनेकडून अनेक संभाव्य नेत्यांना मंत्रीमंडळातून डावलण्यात आले आहे. त्यात भास्कर जाधव यांचा नंबर लागला आहे. मात्र आपल्याला प्रवेश करण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनीच शब्द दिला होता. असं जाधव यांनी सांगितले.
विधानसभेचा मला दीर्घ अनुभव आहे. उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार देखील मला मिळालेला आहे. आपल्याला सत्तेचा मोह नाही, परंतु मंत्रीपद मिळालं नाही. त्यामुळे मी कुठ कमी पडलो या विचारात असल्याचे जाधव यांचे म्हणणे आहे. एकूणच राष्ट्रवादी सोडून शिवसेनेसोबत येऊनही जाधव यांना फारसा फायदा झालेला दिसत नाही. किंबहुना राष्ट्रवादीच बरी होती, अशी चर्चा जाधव यांच्या समर्थकांमध्ये आहे.