"आनंद दिघे ज्या खोलीत झोपले त्याचं झालं मंदिर; वर्षातून केवळ २ दिवस उघडतात"
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2023 02:40 PM2023-01-27T14:40:47+5:302023-01-27T14:41:30+5:30
आनंद दिघे यांना आम्ही देव मानतो. त्यांना खोटे चालत नव्हते. पैसे चालत नव्हते. शब्दाला पक्के होते असं भास्कर शिरसाठ म्हणाले.
नाशिक - धर्मवीर आनंद दिघे यांची आज जयंती असून ठिकठिकाणी त्यांना अभिवादन केले जातेय. आनंद दिघे यांना मानणारे असंख्य कार्यकर्ते आहेत. त्यापैकीच एक नाशिकचे भास्कर शिरसाठ हे आनंद दिघेंना देव मानत होते. नाशिक रोड परिसरात त्यांचा बंगला आहे. त्या बंगल्यात एक खोली कायम आनंद दिघे यांच्यासाठी ठेवण्यात आली आहे. आजही ही खोली कुणी वापरत नसून हे आमच्यासाठी मंदिर आहे अशी भावना भास्कर शिरसाठ यांनी व्यक्त केली.
भास्कर शिरसाठ म्हणाले की, आनंद दिघेसाहेब माझ्याकडे २-३ वेळा मुक्कामाला आले होते. ते माझ्यासाठी देव आहेत कारण ते जेलमध्ये असताना मी घरून जेवण त्यांना द्यायचो. जेलमधून सुटताच साहेब माझ्या घरी आले. आईच्या पाया पडले. तेव्हा त्यांनी आईला तुम्हाला ३ मुले आहेत पण मी चौथा मुलगा आहे. तेव्हापासून ते माझ्या आईला आई आणि आम्हाला भाऊ मानायचे. बंगल्याचं काम सुरू असताना चौथ्या भावासाठी खोली बांधली. आज पुण्यतिथी आणि जयंतीलाच ही खोली उघडली जाते. वर्षातून केवळ २-३ दिवस ही रुम खोलली जाते. याच खोलीत आनंद दिघे यांनी २ वेळा मुक्काम केला. याच खोलीत ते पूजा करायचे. त्यांची माळ आजही आहे असं शिरसाठ यांनी सांगितले.
त्याचसोबत आनंद दिघे यांना आम्ही देव मानतो. त्यांना खोटे चालत नव्हते. पैसे चालत नव्हते. शब्दाला पक्के होते. आमच्याकडे नवरात्र होती तेव्हा त्यांनी स्वखर्चाने सगळं केले. कुणालाही मागण्याची गरज पडत नव्हती. रुद्राक्षाची माळ जपण्याची ती आवड होती. रात्री त्यांना झोप लागत नव्हती. तेव्हा रात्री ही माळ दुकानातून आणली. तेव्हा ती माळ जप केला. ही माळ आजही आमच्याकडे आहे. आनंद दिघे कुणाचेही काम करायचे. अनेक गरजूंना मदत करायचे. आजही त्यांच्या नावाने कामे होतात. त्यांनी सगळ्यांसाठी केले स्वत:साठी काही केले नाही असं भास्कर शिरसाठ म्हणाले.
दरम्यान, आज जर साहेब असते तर राजकारणात पलटी झाली नसती. साहेबांच्या शब्दापुढे कोणीही जात नव्हते. आज कुणीच फुटले नसते. साहेबांच्या नावाला अनेक जण घाबरायचे. आज जे फुटले त्यांनी हे करायला नको हवं होते. एकनाथ शिंदे यांनी जे केले ते चुकीचे केले. शिवसेना संपवण्यासाठी भाजपाने हे केले अशी खंत भास्कर शिरसाठ यांनी व्यक्त केली.