भाटिया कनेक्शन बदलापुरात?
By Admin | Published: January 20, 2016 01:58 AM2016-01-20T01:58:19+5:302016-01-20T01:58:19+5:30
बांधकाम व्यवसायिक आणि मोहन ग्रूपचे भागधारक असलेले अमर भाटिया यांनी तणावातून आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले असले तरी हा तणाव बांधकाम क्षेत्रातील कंत्राटाच्या वादातून होता
पंकज पाटील, बदलापूर
बांधकाम व्यवसायिक आणि मोहन ग्रूपचे भागधारक असलेले अमर भाटिया यांनी तणावातून आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले असले तरी हा तणाव बांधकाम क्षेत्रातील कंत्राटाच्या वादातून होता, बांधकामांसंदर्भातील परवानग्या-तक्रारींचा होता की आर्थिक देवघेवीचा, यावर पोलिसांचा तपास केंद्रीत झाला आहे. अमर यांच्या मृत्युच्या धक्क्यातून त्यांचे कुटुंबीय आणि भागधारक अजून सावरलेले नसल्याने त्यांची चौकशी करून धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न पोलिसांनी केलेला नाही.
मात्र भाटिया यांचे बहुतांश प्रकल्प बदलापुरातील असल्याने, त्याबाबत त्यांनी आणि अन्य व्यक्तींनी वेगवेगळ््या तक्रारी केलेल्या असल्याने त्यातील तणाव त्यांच्या आत्महत्येमागे असेल तर त्याचे कनेक्शन बदलापुरातच असेल असा निकटवर्तीयांचा दावा आहे. बांधकाम व्यावसायिकांनी मोठ्या व्याजाने उचललेली कर्जे किंवा तक्रारी करून त्यांची बांधकामे अर्धवट अवस्थेत रोखण्याचा प्रयत्न किंवा बांधकाम साहित्याच्या कंत्राटातील वाद आणि त्यातून आलेले पराकोटीचे नैराश्य याला कारणीभूत आहे का हा मुद्दाही तपास अधिकाऱ्यांपुढे आहे.
भाटिया यांनी आत्महत्या करण्याआधी मी तणावात असल्याचा आणि माझ्या मुलांचा सांभाळ करण्याचा संदेश मामाला मोबाईलवरुन दिला होता. त्या
आधारे ही आत्महत्याच असल्याचे पोलीस सांगत असले, तरी त्यामागील तणाव शोधण्यास पोलिसांचे प्राधान्य आहे.
ज्या मोहन ग्रूपसोबत भाटिया होते, त्या ग्रुपचे मोठे गृहप्रकल्प बदलापुरात सुरु आहेत. त्यांच्या अनेक इमारतींच्या बांधकामांबाबत तक्रारी केल्या गेल्या होत्या. त्याच्या चौैकशीचा ताण त्यांच्यावर होता का, हा मुद्दाही चर्चेत आहे.
भाटिया संबंधित असलेल्या इतर काही बांधकामांविषयीदेखील तक्रार असल्याचे सांगितले जाते, पण त्याला स्पष्ट दुजोरा अधिका-यांनी दिलेला नाही. मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक केल्याच्या तक्रारी गेल्यावर कर्जाच्या ओझ्याने बांधकाम व्यावसायिक तणावाखाली येतात. तसाच प्रकार त्यांच्या बाबतीत घडला आहे का, हाही मुद्दा सध्या चर्चेत आहे.
बांधकाम व्यावसायिक अमर भाटिया यांच्या आत्महत्येचे गूढ कायम असले तरी ते गेल्या तीन-चार महिन्यांपासून तणावाखाली होते, असे दिसून येत आहे. त्यांच्या जीवनातील हे नैराश्य त्यांच्या फेसबुक अकांऊटमध्ये उघडपणे दिसते आहे. गेल्या दोन महिन्यात त्यांनी ज्या पोस्ट केल्या आहेत, त्यावरुन ते मृत्युला आपल्या जवळ करीत असल्याची जाणीव तीव्रतेने होते...
‘दिल करता है मर ही जाऊँ... सुना है बहुत याद किया जाता है मरने के बाद...’
‘कुछ लोग आँसुओ की तरह होते है, पता नहीं चलता साथ दे रहे है, या साथ छोड रहे है’
‘मेरे साथ बैठके वक्त भी रोया था एक दिन; बोला, बंदा तू ठिक है, मैं ही खराब चल रहां हू’
‘शुक्र करो की दर्द सहते है हम, लिखते नहीं... वर्ना कागजों पे लफ्जों के जनाजे उठते...’
‘काश ये बात लोग समझ जाये की रिश्ते एक दूसरे का ख्याल रखने के लिए बनाए जाते है, एक दूसरे का इस्तेमाल करने के लिए नहीं’ बदलापुरात कोणत्याही मोठा बिल्डरचा बांधकाम प्रकल्प सुरू झाला की तेथे बांधकाम साहित्य पुरविण्याचा मोठा वाद असतो. असा काही वाद भाटिया यांच्यासोबत होता का, याची चाचपणी. जागेची खरेदी करतांना स्थानिक शेतक-यांशी काही वाद झाल्यास तो तणावही संबंधित बांधकाम व्यवसायिकावर असतो. असा काही प्रकार भाटिया यांच्यासोबत घडला होता का, याची चौकशी.
भाटिया यांच्या बांधकामाबाबत तक्रार करुन कोणी त्यांना ब्लॅकमेल करत होते का, याची चौकशी करणे. मोहन ग्रूपमध्ये भागधारक असतांना त्यांनी प्रकल्पांसाठी कर्ज रूपाने रक्कम उचलली होती का आणि त्या कर्जाची परतफेड करता आली नाही, त्यातून धमक्या आल्या, असा काही प्रकार होता का?
बांधकाम व्यवसाय क्षेत्रात मंदी असल्याने भाटिया यांच्यावर कर्जाचे काही ओझे होते का, याचा तपास. भागीदारांसोबत किंवा व्यवसायाशी निगडीत व्यक्तींसोबत काही वाद होते का, त्याचा ताण शोधणे. गुंगीचे औषध देऊन किंवा अन्य प्रकारे भाटिया यांची हत्या करुन त्यांना रेल्वेखाली टाकले गेले का, याची चौकशी.