भाटिया यांची आत्महत्याच

By admin | Published: January 19, 2016 04:09 AM2016-01-19T04:09:01+5:302016-01-19T04:09:01+5:30

मोहन ग्रुपचे भागधारक असलेले आणि बांधकाम व्यावसायिक असलेले अमर भाटिया यांनी रेल्वेखाली आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होत आहे

Bhatia's suicide | भाटिया यांची आत्महत्याच

भाटिया यांची आत्महत्याच

Next

अंबरनाथ : मोहन ग्रुपचे भागधारक असलेले आणि बांधकाम व्यावसायिक असलेले अमर भाटिया यांनी रेल्वेखाली आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होत आहे. गेल्या काही दिवसांपासून ते तणावात असल्यानेच हा प्रकार घडल्याचे
पुढे येत आहे. शनिवारी रात्री बेलवली रेल्वे फाटकाजळ त्यांचा मृतदेह सापडला होता. त्यांचा मृत्यू अपघात वाटत असला तरी आता पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात हा अपघाती मृत्यू नसून ती आत्महत्या असल्याचे स्पष्ट होत आहे. अमर यांनी आत्महत्येआधी आपल्या मोबाइलवरून आपल्या मामाला एक एसएमएस करून ‘माझ्या मुलांना सांभाळा. मी आत्महत्या करीत आहे.’ असा संदेश पाठविला होता. हा एसएमएस पोलिसांच्या हाती लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून ते तणावाखाली होते, असेही पुढे येत आहे. तसेच त्यांचा मृतदेह ज्या ठिकाणी सापडला, त्या ठिकाणापासून काही अंतरावर त्यांची कारदेखील होती. तसेच त्यांचे मोबाइल हे गाडीत होते. त्यामुळे तणावातून त्यांनी ही आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
सोमवारी दुपारी लोहमार्ग पोलीस उपायुक्त रूपाली अंभुरे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तसेच अधिकाऱ्यांना या घटनेच्या तपासाच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण माहिती संकलित करण्याचे आदेश दिले आहेत.
अमर भाटिया यांचा मृतदेह ज्या अवस्थेत होता, त्यात त्यांचे शरीर आणि मुंडके हे वेगळे झाले होते. त्यामुळे रुळावर मान ठेवून ही आत्महत्या केल्याचा अंदाज पोलीस व्यक्त करीत आहेत.
शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात काही सापडले नसले तरी त्यांचा व्हिसेरा आणि रक्ताचे नमुने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत.
पोलिसांना ही घटना आत्महत्या वाटत असली तरी त्यामागे काही घातपात आहे का, या अनुषंगानेही तपास करण्यात येत आहे.
रक्ताच्या नमुन्यांमध्ये विषप्रयोग किंवा गुंगीच्या औषधांची मात्रा होती का, याचाही अहवाल आल्यावर तपासाची दिशा स्पष्ट होणार आहे.

Web Title: Bhatia's suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.