भटजी न बोलावल्याने वाळीत टाकले!
By Admin | Published: March 9, 2015 01:36 AM2015-03-09T01:36:19+5:302015-03-09T01:36:19+5:30
वडिलांच्या बाराव्याला भटजीला बोलावले नाही म्हणून तालुक्यातील मार्गताम्हाणे गोपाळवाडी येथील साबळे कुटुंबाला दोन वर्षांपासून वाळीत टाकण्यात आले आहे
चिपळूण : वडिलांच्या बाराव्याला भटजीला बोलावले नाही म्हणून तालुक्यातील मार्गताम्हाणे गोपाळवाडी येथील साबळे कुटुंबाला दोन वर्षांपासून वाळीत टाकण्यात आले आहे. साबळे कुटुंबाने न्याय मिळण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे.
दापोली तालुक्यात मुरुड, लोणवडी व चिखलगाव येथे मानपानावरून वाळीत टाकण्याचे प्रकार उघडकीस आले होते. आता चिपळूण तालुक्यातही त्याचे लोण पसरल्याचे उघड झाले आहे. साबळे कुटुंबीयांनी रविवारी पत्रकार बैठक घटनेची माहिती दिली. मनोहर तुकाराम साबळे, चंद्रकांत तुकाराम साबळे हे मार्गताम्हाणे गोपाळवाडी येथील मूळ रहिवाशी असून, नोकरीनिमित्त ते मुंबई येथे वास्तव्यास आहेत. त्यांच्या घरी आई, काकी, काकू राहतात. ही मंडळी ८५ वर्षांपेक्षा जास्त वयाची आहेत. २६ डिसेंबर २०१३ रोजी तुकाराम साबळे यांचे बारावे होते. त्यासाठी भटजीला न बोलविता आपण बारावे करणार आहोत, अशी कल्पना साबळे बंधूंनी वाडीची बैठक घेऊन दिली होती. परंतु, बाराव्याच्यावेळी वाडीतील काही लोकांनी जर तुम्हाला आमच्या मतांनी चालायचे नसेल, तर वाडीशी तुमचा संबंध राहणार नाही. तुमच्या सुखदु:खात, कोणत्याही कार्यक्रमात मार्गताम्हाणे गोपाळवाडी भाग घेणार नाही, असे सांगितले होते.
त्यानंतर वाडीतील कोणाच्याही घरी साखरपुडा, विवाह, बारसे अथवा कोणताही सुखदु:खाचा प्रसंग असेल, तर आम्हाला कोणी बोलवत नाहीत. त्याप्रमाणे घरामध्ये आजूबाजुला कोणतेही मजुरीचे काम करायचे असेल तर मजुरी करणाऱ्या लोकांनादेखील घरी मजुरीसाठी पाठवत नाहीत, असे साबळे कुटुंबीयांनी सांगितले.
आम्हाला पुन्हा समाजात घ्यावे, यासाठी २ डिसेंबरला बैठक होणार होती. मात्र संबंधितांनी प्रतिसाद न दिल्याने ४ जानेवारीच्या बैठकीला उपस्थित राहण्याची तयारी दर्शविली. बैठकीत तुम्ही आमच्या मताप्रमाणे वडिलांचे कार्य न केल्याने जर तुम्हाला वाडीत घ्यायचे असेल, तर दंड द्यावा लागेल, असे सांगण्यात आले. परंतु, गुन्हा न केल्याने हे मंजूर नाही, असे सांगून बैठक आम्ही सोडली. तेव्हा लोक अंगावर धावून आले, असे साबळे कुटुंबीयांनी सांगितले. साबळे कुटुंबीयांच्या वाळीत प्रकरणाबाबत अंनिसचे निखिल भोसले, मनोहर साबळे आदींनी नाराजी व्यक्त केली.