भाऊसाहेब चव्हाणच्या चौथ्या लॉकरमध्ये 65 लाखांचं घबाड
By admin | Published: May 11, 2016 05:20 PM2016-05-11T17:20:41+5:302016-05-11T18:43:11+5:30
भाऊसाहेब चव्हाण आणि आरती चव्हाण याच्या बँकेतील चौथा लॉकर आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिका-यांनी आज तपासणीदरम्यान उघडलं
Next
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 11- केबीसी घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेला आरोपी भाऊसाहेब चव्हाण आणि आरती चव्हाण याच्या बँकेतील चौथा लॉकर आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिका-यांनी आज तपासणीदरम्यान उघडलं आहे. त्याच्या लॉकरमध्ये 65 लाख रुपयाचे सोन्याचे दागिने सापडले आहेत. याआधीही भाऊसाहेब चव्हाणचे तीन लॉकर उघडण्यात आले होते. त्यामध्येही कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने सापडले होते. पोलीस आता भाऊसाहेब चव्हाणची कसून चौकशी करत आहेत. भाऊसाहेब चव्हाणकडून आणखी काही लपवलेले सोन्याचे दागिने अथवा रक्कम मिळण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
काय आहे केबीसी प्रकरण ?
लाखो गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घालणारा 'केबीसी’चा संचालक भाऊसाहेब चव्हाणला अखेर अटक करण्यात यश आलं. भाऊसाहेब चव्हाणला मुंबई विमानतळावरून अटकही करण्यात आली. त्यानंतर त्याची कसून चौकशी केली असता, भाऊसाहेब चव्हाणच्या बँक लॉकरमधून 2 कोटी किंमत असलेलं 2 किलो 600 ग्रॅम सोन्याची नाणी आढळली. ‘केबीसी’ कंपनीच्या माध्यमातून, गुंतवणूकदारांना अल्पावधीत दामदुप्पट आणि अधिक व्याजदराचं आमिष दाखवून अनेकांना ठकवल्याचा त्याच्यावर आरोप आहे.. गुंतवणूकदारांना तब्बल 220 कोटींचा गंडा घातल्याप्रकरणी तो मुख्य आरोपी आहे. गुंतवणुकीपोटी दामदुप्पट परताव्याचे आमिष दाखवून भाऊसाहेब चव्हाणच्या ‘केबीसी’ कंपनीने राज्यभरात लाखो गुंतवणूकदारांना ठकवलं आहे. बरेच जण ‘केबीसी’च्या आमिषाला बळी पडले आणि आयुष्यभराची रक्कम ‘केबीसी’मध्ये गुंतवली. मात्र, यातील बहुतेकांना या पैशावर पाणी सोडावे लागले. त्यांना परतावा तर सोडाच परंतु मूळ रक्कमही मिळाली नाही. या प्रकरणात गुंतवणूकदारांच्या असंख्य तक्रारी फेब्रुवारी 2014ला राज्यातील विविध पोलीस ठाण्यांत दाखल झाल्या. त्यानंतर केबीसीचा संचालक भाऊसाहेब चव्हाणसह पत्नी आणि मेहुण्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आणि त्याला अटक केली.
‘केबीसी’च्या माध्यमातून दाखवलेली आमिषं
17 हजार 500 गुंतवणूक करणारे 7 सदस्य केल्यास महाराष्ट्रात मोफत टूर
17 हजार 500 गुंतवणूक करणारे 36 सदस्य केल्यास गोव्यात एक मोफत टूर
17 हजार 500 गुंतवणूक करणारे 81 सदस्य केल्यास दर महिन्याला पाच हजारांचा धनादेश
17 हजार 500 गुंतवणूक करणारे 252 सदस्य केल्यास एक लाखाचा एक चेक किंवा दरमहा दहा हजार रुपयांचा चेक
17 हजार 500 गुंतवणूक करणारे 756 सदस्य केल्यास एजंटला दर महिन्याला 51 हजार रुपये
17 हजार 500 गुंतवणूक करणारे 2268 सदस्य केल्यास एजंटला प्रतिमहिना एक लाख किंवा सात लाखाचे दागिने
17 हजार 500 गुंतवणूक करणारे 6804 सदस्य केल्यास एक स्कोडा गाडी मोफत
17 हजार 500 गुंतवणूक करणारे 12600 सदस्य केल्यास 51 लाखांचा बंगला मोफत
17 हजार 500 गुंतवणूक करणारे 25556 सदस्य केल्यास एक कोटी रोख रक्कम मिळणार