प्रतापगड किल्ल्यावर भवानी मातेचा गजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2016 03:16 AM2016-10-03T03:16:28+5:302016-10-03T03:16:28+5:30
अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या प्रतापगडवासिनी भवानी मातेच्या शारदोत्सवाला सुरुवात झाली.
पोलादपूर : अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या प्रतापगडवासिनी भवानी मातेच्या शारदोत्सवाला सुरुवात झाली. किल्ले प्रतापगडावर छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते संकल्प सोडून घटस्थापना करून नवरात्रौत्सवास प्रारंभ झाला. यावेळी कल्पनाराजे भोसले, उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत नवरात्रौत्सवात गडावर विविध धार्मिक कार्यक्र मांचे आयोजन करण्यात येते.
बुधवारी चतुर्थीच्या दिवशी भवानी माता मंदिराला ३५६ वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून रात्री साडेआठ वाजता गडावर ३५६ मशाली प्रज्वलित करून मशाल महोत्सव साजरा होणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात ढोल पथकाच्या लयबद्ध वादनाने होणार असून रात्री साडेनऊ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
ललिता पंचमीच्या दिवशी पालखी सोहळ्याचे आयोजन केले आहे. नवरात्रौत्सवात गडावरील पारंपरिक सेवेकरी आपआपली सेवा बजावून भाविकांची सोय करतात. दरवर्षी प्रतापगडावर मशाल महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असून संपूर्ण गडावर रोषणाई करण्यात येते. शारदोत्सव काळातही लाखो भाविक भवानी मातेचे दर्शन घेतात. (वार्ताहर)
>नागोठणेत भैरवनाथ मंदिरात नवरात्रौत्सव
ग्रामदैवत श्री जोगेश्वरीमाता - भैरवनाथ मंदिरातील नवरात्रौत्सवास प्रारंभ झाला आहे. दहा दिवस भजन, दुर्गा सप्तशती पाठ, भोंडला, महाआरती, हरिपाठ, विविध आळ्यांतील गरबा नृत्याचे कार्यक्रम होणार आहेत. विजयादशमीला सायंकाळी ६ वाजता सोने लुटण्याचा कार्यक्र म होणार आहे. हजारो भाविक ग्रामदेवतांचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात गर्दी करीत आहेत.