इंद्रायणी काठावर अवतरली पंढरी
By admin | Published: June 28, 2016 01:40 AM2016-06-28T01:40:12+5:302016-06-28T01:40:12+5:30
संतश्रेष्ठ तुकाराममहाराजांचा पालखीसोहळा आषाढी वारीसाठी पंढरीकडे मार्गस्थ झाला.
देहूगाव : संतश्रेष्ठ तुकाराममहाराजांचा पालखीसोहळा आषाढी वारीसाठी पंढरीकडे मार्गस्थ झाला. देहूकरांनी वैष्णवांची मनोभावे सेवा केली. अन्नदान केले. सोहळ्यास अभूतपूर्व पोलीस बंदोबस्त होता. पालखी सोहळ्याने देहूतील वातावरण भक्तिमय झाले आहे.
‘‘पुण्य उभे राहो आता, संताचे या कारण, पंढरीच्या लागा वाटे, सखा भेटे विठ्ठल...’ याप्रमाणे समाजातील सर्वधर्मसमभावाची व त्यागाचे प्रतीक असलेली भगवी पताका हवेत उंचावत पालखी सोहळ्यातून एकात्मतेचे दर्शन घडले. मुख्य मंदिर, वैकुंठगमन मंदिर परिसरातील इंद्रायणी काठ सकाळपासूनच फुलून गेलेला होता. इंद्रायणी नदीच्या काठावर व मुक्कामाच्या ठिकाणी दिंड्यांमध्ये पताकांसह वारकऱ्यांचे खेळ रमले होते. मंदिराच्या आवारात पालखी प्रदक्षिणेसाठी बाहेर पडल्यानंतर फुगडी, टाळाच्या तालावर पावले टाकली जात होती, तर काही भाविक उंचच उंच उडी घेत ‘विठ्ठल विठ्ठल’ असा मंत्र जपत आपला थकवा घालवत होते.
मानकरी, सेवेकरी
चोपदार नामदेव गिराम (देशमुख), श्री. खैरे यांच्यासह सेवेकरी, मानकरी यांचा संस्थानच्या वतीने नारळ प्रसाद देऊन सन्मान करण्यात आला. परंपरेनुसार ताशा वाजविण्याचा मान रफिक मुलानी, चौघड्याचा माऊली पांडे,
पिराजी पांडे, मंगेश पांडे, उमाजी पांडे यांना, तर पालखी उचलण्याचा मान कळमकर, प्रकाश टिळेकर,
नामदेव भिंगारदिवे, आबू पवार यांना होता. संबळ व चौघड्याच्या
तालावर चांदीची अब्दागिरी रघुनाथ अडागळे यांनी, तर माणिक अवघडे जरीपटका घेतला. पोपट तांबे यांनी तुतारी, तर बलभीम भांडे यांनी संबळ वाजविला.
मुक्कामासाठी इनामदार वाड्याकडे रवाना झाली. येथे प्रथेप्रमाणे रात्री म्हतारबुवा खानापूरकर यांचे कीर्तन व जागर झाला. दुसऱ्या दिवशी भागवतबुवा बोळेगावकर यांचे इनामदारवाड्यातून आकुर्डीकडे पालखी प्रस्थान होण्यापूर्वी कीर्तन झाले. येथून पालखी उद्या सकाळी साडेदहाला आकुर्डीकडे मार्गस्थ होईल, असे पालखीप्रमुख सुनील दामोदर मोरे यांनी सांगितले. विश्वशांती केंद्राचे
डॉ. विश्वनाथ कराड, दिगंबर
भेगडे, किरण काकडे, संदीप कोहिनकर, अजय भोसले, सचिन टिळक उपस्थित होते. (वार्ताहर)
>पादुकांची सेवा
देहूतील सुनील घोडेकर (सराफ) यांनी चकाकी दिल्यानंतर घोडेकर कुटुंबीयांनी इनामदार वाड्यात आणल्या. तेथे पूजा करण्यात आली. गंगा म्हसलेकर कुटुंबीयांनी पादुकांना मुख्य मंदिरात नेले. ग्रामोपाध्याय सुभाष टंकसाळे व गिरीधर खुंटे यांनी मंत्रोच्चार केला.
रंगल्या फुगड्या
ज्ञानोबा तुकोबांच्या जयघोष, टाळ मृदंग गजराने देहूगाव नागरी भक्तीमय झाली. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, पालकमंत्री गिरीश बापट आणि पाणीपुरवठा मंत्री बबन लोणीकर यांनी फुगड्यांचा आनंद लुटला.
पावसाची हजेरी
सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारपर्यंत काहीसा उकाडा जाणवत होता. दुपारी दीडच्या सुमारास सुमारे वीस मिनिटे वरुण राजानेही हजेरी लावली. ऊन-सावल्यांचा खेळ सुरू होता. या आल्हाददायक वातावरणात हरीगजर सुरू होता.