सूक्ष्म सिंचनासाठी भवरलालजींचे योगदान ‘नोबेल’ पुरस्काराच्या तोडीचे - राज्यपालांचे गौरवोद्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 04:04 AM2017-10-17T04:04:18+5:302017-10-17T04:04:53+5:30
खान्देशच्या भूमीत शून्याचा शोध लावणा-या भास्कराचार्यांनंतर आठशे वर्षांनंतर जैन उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष भवरलालजी जैन यांनी उच्च कृषी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जगातील कृषी क्षेत्राला एक नवी दिशा दिली
मुंबई : खान्देशच्या भूमीत शून्याचा शोध लावणा-या भास्कराचार्यांनंतर आठशे वर्षांनंतर जैन उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष भवरलालजी जैन यांनी उच्च कृषी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जगातील कृषी क्षेत्राला एक नवी दिशा दिली. सूक्ष्म सिंचनासाठीचे त्यांचे योगदान ‘नोबेल’ पुरस्काराच्या तोडीचे आहे, असे गौरवोद्गार राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी काढले. भवरलालजींनी ग्रामीण भारतात उच्च कृषी तंत्रज्ञान व मायक्र ो इरिगेशनद्वारे (सूक्ष्म सिंचन) लाखो अल्पभूधारक शेतकºयांना समृद्ध केले. त्यांचे योगदान भारतातून ‘नोबेल’ पुरस्कारासाठी नक्कीच पात्र आहे, असे राज्यपाल म्हणाले.
मुंबईतील ट्रायडंट हॉटेल येथे रविवारी परमार्थ सेवा समितीतर्फे दिवंगत भवरलालजी जैन यांच्या जीवनकार्याचा सी. विद्यासागर राव व न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या हस्ते ‘परमार्थ रत्न’ सन्मानाने गौरव करण्यात आला. जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी हा सन्मान स्वीकारला. अत्यंत साधी जीवनशैली आयुष्यभर अंगीकारून सामान्यातून असामान्य कार्य त्यांनी निर्माण केले. कधीकाळी केरोसीन विकण्याच्या व्यवसायाला अंगीकारणाºया भवरलालजींनी केवळ ७ हजार रुपये भांडवलावर व्यवसायाची पायाभरणी केली. चार दशकांत जागतिक पातळीवर नावलौकिक मिळवणारी बहुराष्ट्रीय कंपनी नावरु पास आणली, असेही राज्यपाल म्हणाले.
गांधी विचारांवर नितांत श्रद्धा
लोकसहभागावर त्यांचा अधिक विश्वास होता. गांधी विचारांवर श्रद्धा ठेवत विश्वस्ताच्या भूमिकेतून उद्योगाला आकार देणाºया उद्योगपतींमध्ये जमनालाल बजाज यांच्यानंतर त्यांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल, असे ज्येष्ठ गांधीवादी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी म्हणाले.
जैन परिवारातर्फे जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन यांनी सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. हृदयविकाराचे आव्हान स्वीकारत त्यांनी शेतकºयांसाठी कृषी उद्योगाला आकार दिला, असे ते म्हणाले. सोहळ््यास ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, कल्पतरु चे अध्यक्ष मोफतराज मुणोत, सुप्रिमचे अध्यक्ष महावीर तापडीया, पिरामल गृपचे दिलीप पिरामल, बिझनेस इंडियाचे अशोक अडवानी, बीग बाजारचे अध्यक्ष किशोर बियाणी, आयडीबीआयचे कार्यकारी संचालक अभय बोंगीरवार, परमार्थ सेवा समितीचे अध्यक्ष लक्ष्मीनारायण बियाणी आदी उपस्थित होते.