भावना गवळी, कृपाल तुमानेंना विधानपरिषदेची उमेदवारी; शिंदे गटात नाराजी
By मनोहर कुंभेजकर | Published: July 2, 2024 06:01 PM2024-07-02T18:01:26+5:302024-07-02T18:01:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई- विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी येत्या दि,१२ जुलै रोजी या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. आज अनेक उमेदवारांनी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई- विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी येत्या दि,१२ जुलै रोजी या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. आज अनेक उमेदवारांनी या निवडणुकीसाठी अर्ज भरला आहे. विधान परिषदेच्या ११ जागांसाठी एकूण १२ उमेदवार मैदानात आहेत. मात्र शिंदे सेनेतून पाच वेळा वाशीमच्या खासदार राहिलेल्या माजी खासदार भावना गवळी आणि दोन वेळा खासदार राहिलेले रामटेकचे माजी खासदार कृपाल तुमाने यांना विधानपरिषदेसाठी उमेदवारी दिल्याने शिंदे सेनेत नाराजी पसरली आहे. आगामी विधानसभेच्या निवडणूक शिंदे सेनेसाठी कठीण असल्याची चर्चा आहे.
खासदार राहिलेल्यांचे पुनर्वसन विधानपरिषदेवर केले, त्यांना विधानसभेला तिकीट देता आले असते. आम्हाला मतदार संघ नाही. विशेष म्हणजे गवळी आणि तुमाने हे दोघेही विदर्भातले आहे. मात्र आम्ही मुंबईकर असून आम्हाला या निवडणुकीत डावलले, अशी दबक्या आवाजात खदखद शिंदे सेनेच्या इच्छुकांमध्ये असल्याचे समजते.
दक्षिण मुंबईत शिंदे सेनेच्या यामिनी जाधव यांचा आणि दक्षिण मध्य मुंबईतून राहुल शेवाळे यांचा पराभव झाल्याने त्यांचे कार्यकर्ते सुस्त झाले आहेत. मग मुंबईत शिंदे सेनेचे नवे नेतृत्व कसे तयार होणार? आगामी विधानसभा निवडणुकांना कसे सामोरे जाणार असा सवाल शिंदे सेनेच्या समर्थकांनी केला.
विधानपरिषेच्या मुंबई पदवीधर आणि मुंबई शिक्षक निवडणुकीत मुंबईत महायुतीचा दारुण पराभव झाला. महायुतीत समन्वयाचा अभाव होता. भाजप उमेदवार किरण शेलार यांच्यासाठी महायुतीची संयुक्त बैठक झालीच नाही. महाविकास आघाडीचे अँड.अनिल परब यांच्या समोर तगडा उमेदवार द्यायला हवा होता, शिक्षक मतदार संघात महायुती असतांना शिंदे सेना, व अजित पवार गट यांनी आपले आपले उमेदवार उभे केले. परिणामी महायुतीची ही महत्त्वाची जागा गेली, आणि ८० वर्षांचे महाविकास आघाडीचे उमेदवार ज.मो.अभ्यंकर निवडून आले, अशी माहिती शिंदे सेनेच्या सूत्रांनी लोकमतला दिली.
शिंदे सेनेतून विधानपरिषदेच्या आमदार मनीषा कायंदे, माजी आमदार किरण पावसकर, माजी आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत, शिंदे सेनेचे सचिव संजय मोरे, उपनेत्या शीतल म्हात्रे आदी दिग्गज इच्छुक असताना संसदेत खासदारकी करणाऱ्या भावना गवळी आणि माजी खासदार कुपाल तुमाने यांना कोणत्या आधारावर आता विधानपरिषदेचे तिकीट दिले, असा सवाल शिंदे समर्थक विचारत आहेत. गवळी आणि तुमाने यांना खासदारकी नाकारली, मग त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना शिंदे सेनेचे मुख्य नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिकीट कोणत्या निकषावर दिले अशी खदखद इच्छुकांमध्ये आहे.