Bhaiyyu maharaj suicide: भय्यू महाराजांनी का आणि कुणामुळे केली आत्महत्या? त्यांना त्रास देणारी धक्कादायक कारणे...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 04:34 PM2018-06-12T16:34:38+5:302018-06-12T16:43:11+5:30
एकीकडे जीवापाड प्रेम करणारे लाखो अनुयायी तर दुसरीकडे या मूठभरांचा जाच भय्युजींना असह्य झाला होता.
मुंबई: अध्यात्मिक गुरु भय्यू महाराजांनी आत्महत्या केल्यानंतर मिळालेल्या पत्रात मानसिक तणावाचा उल्लेख आहे. हा मानसिक तणाव नेमका कशामुळे त्याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या निकटवर्तीय वर्तुळातून त्यांच्या जीवनातील ताण-तणावामागची काही कारणे समोर आली आहेत.
अतिसंवेदनशील स्वभाव, सातत्याने जनोपयोगी कार्यक्रमाच्या आयोजनाचा आग्रह धरणाऱ्या भय्यू महाराराजांकडे आर्थिक साधने पुरेशी नसल्याने आर्थिक आघाडीवर त्रास सहन करावा लागत असे. त्यातच अनुयायी असल्याचा आव आणणाऱ्यांकडूनही अनेकदा फसवणूक केली जात असल्याची खंतही ते बोलून दाखवत असत. एकीकडे जीवापाड प्रेम करणारे लाखो अनुयायी तर दुसरीकडे या मूठभरांचा जाच भय्युजींना असह्य झाला होता. शारीरिक त्रासामुळे होणाऱ्या वेदनांकडे समाजाप्रति असलेल्या निष्ठेमुळे दुर्लक्ष करत भय्युजी कार्यरत राहत असतानाच त्यांना त्यांच्या संवेदनशील स्वभावाचा गैरफायदा घेऊन काही लबाड त्रास देत असत, त्याच्या वेदना ते जवळच्यांकडे बोलून दाखवत असत, असेही सुत्रांनी सांगितले.
भय्युजींच्या स्वभावाचा गैरफायदा घेऊन अशा लबाडांनी त्यांना खूप त्रास दिला होता. त्यातील काहींनी तर मागण्या पूर्ण न झाल्याने काहीवेळा त्यांची नाहक बदनामीही केली. भय्युजी अशा प्रवृत्तींबद्दल खाजगीत वेदनाही व्यक्त करत असत. त्यातच त्यांच्या गतायुष्यात झालेल्या त्रासामुळे त्यांच्या शरीरावरही परिणाम झाला होता. सातत्याने शारीरिक त्रासात असतानाही ते वैद्यकिय सल्ल्याकडे दुर्लक्ष करुन, त्रासाची पर्वा न करता सातत्यानं कार्यरत राहण्याचा प्रयत्न करत. त्यातून तो त्रास अधिकच वाढत असे. त्यांच्या बोलण्यातून हा शारीरिक त्रास परवडला मात्र आर्थिक फसवणूक, आपल्यांकडून विश्वासघाताच्या वेदना असह्य असल्याची वेदना व्यक्त होत असे.
मधल्या काळात त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यातून ते सावरत असतानाच त्यांच्या मातोश्री आजारी होत्या. त्याच दरम्यान त्यांच्या पहिल्या पत्नीचे निधन झाले. स्वत:च्या लाडक्या लेकीचे कुहूचे जीवन घडवत ते जगत असतानाच जवळच्यांच्या आग्रहामुळे त्यांनी दुसरे लग्न केले. त्या लग्नाच्या निमित्तानेही एका वर्गाने त्यांच्या बदनामीचा घातकी प्रयत्न केला. त्यामुळेही ते आपली वेदना बोलून दाखवत असत.
एकेकाळी महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात राजगुरुसारखा दबदबा असणाऱ्या भय्युजींना सामाजिक कार्यात पाहिजे तशी साथ मिळत नसल्यानेही त्यांना खूप त्रास होत असे. एकाचवेळी अनेक उपक्रम राबवताना त्यांची, त्यांच्या सूर्योदय आश्रमाची, त्यांच्या हितचिंतकांची खूपच धावपळ होत असे. तसेच आर्थिक तणावही सहन करावा लागत असे. त्यात पुन्हा जवळ असल्याचा आव आणून आर्थिक गैरफायदा घेणाऱ्यांकडून होणारा त्रास वेगळाच होता. त्यांच्या जवळच्या वर्तुळातील शिष्यांच्यामते अतिसंवेदनशील असल्याने भय्युजी महाराजांना या साऱ्याचा मानसिक त्रास होत असे. त्यातूनच त्यांचा मानसिक तणाव वाढत गेला आणि त्यांनी टोकाचे पाऊल उचलले असण्याची शक्यता आहे.