माजी महापौरांसाठी उघडले बालेकिल्ल्याचे द्वार
By admin | Published: January 15, 2017 05:05 AM2017-01-15T05:05:12+5:302017-01-15T05:05:12+5:30
पाच वर्षे बांधलेल्या प्रभागाचे फेररचनेत तुकडे झाल्याचा फटका निम्म्याहून अधिक नगरसेवकांना बसला आहे. मतदार विखुरले गेल्याने निवडून येण्याची शाश्वतीही अनेकांना नाही.
मुंबई : पाच वर्षे बांधलेल्या प्रभागाचे फेररचनेत तुकडे झाल्याचा फटका निम्म्याहून अधिक नगरसेवकांना बसला आहे. मतदार विखुरले गेल्याने निवडून येण्याची शाश्वतीही अनेकांना नाही. यामुळे बऱ्याच जणांनी पक्षातील आपले राजकीय वजन वापरून आपली जागा सेफ करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. जिथे अनेकांसाठी दरवाजे बंद झाले तेथे काहींसाठी सुवर्णसंधी चालून आली आहे. मुंबईच्या माजी महापौर श्रद्धा जाधव यांचा पुन्हा त्यांच्या बालेकिल्ल्यात जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे स्वगृही परतण्यासाठी त्यांनीही जोरदार प्रयत्न सुरू केले असल्याचे सूत्रांकडून समजते.
परळ येथील भोईवाडा प्रभागातून शिवसेनेच्या तिकिटावर श्रद्धा जाधव १९९२ मध्ये पहिल्यांदा निवडून आल्या. त्यानंतर पुढील सलग दोन पालिका निवडणुकांमध्ये जाधव या प्रभागातून निवडून आल्या. परंतु २००७ मध्ये त्यांच्या प्रभागात बदल होऊन एफ/उत्तर मधील अॅण्टॉप हिल, परळ येथून त्यांना निवडणूक लढवावी लागली. २००९ मध्ये त्यांना मुंबईच्या महापौरपदाचाही बहुमान मिळाला. २०१२ मध्येही पुन्हा त्यांना याच प्रभागातून निवडणूक लढवावी लागली. मात्र स्वगृही परतण्याची त्यांची ओढ कायम होती. २०१७ च्या निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या आरक्षणात त्यांना ही संधी चालून आली आहे.
परळ, भोईवाडा हा त्यांचा जुना प्रभाग आता महिलांसाठी आरक्षित झाला आहे. त्यामुळे आपल्या हक्काच्या प्रभागात जाण्यास त्या आता इच्छुक आहेत. तशी इच्छाही त्यांनी पक्षाकडे व्यक्त केली आहे. सध्या या प्रभागात शिवसेनेचे नंदकिशोर विचारे नगरसेवक आहेत. मात्र या प्रभागातून निवडून येण्याची श्रद्धा जाधव यांना खात्री आहे. त्यामुळे आपल्या जुन्या प्रभागातून निवडणूक लढवू दिल्यास त्यांच्या विद्यमान प्रभागात उभ्या राहणाऱ्या शिवसेना पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणण्याची हमी त्यांनी पक्षाला दिली आहे, असे पक्षातील विश्वसनीय सूत्रांकडून समजते. (प्रतिनिधी)
जुना प्रभाग आरक्षित
परळ, भोईवाडा हा त्यांचा जुना प्रभाग आता महिलांसाठी आरक्षित झाला आहे. त्यामुळे आपल्या हक्काच्या प्रभागात जाण्यास त्या आता इच्छुक आहेत. तशी इच्छाही त्यांनी पक्षाकडे व्यक्त केली असल्याचे सांगण्यात येते.