कोरेगाव भीमा प्रकरण - भिडे गुरुजींना ‘क्लीन चिट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 05:40 AM2018-03-28T05:40:16+5:302018-03-28T05:40:16+5:30
कोरेगाव भीमा प्रकरणात संभाजी भिडे गुरुजींचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचा कुठलाही पुरावा हाती लागलेला नाही. शिवाय, ज्या महिलेने त्यांच्याविरोधात तक्रार केली होती
मुंबई : कोरेगाव भीमा प्रकरणात संभाजी भिडे गुरुजींचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचा कुठलाही पुरावा हाती लागलेला नाही. शिवाय, ज्या महिलेने त्यांच्याविरोधात तक्रार केली होती तिनेच आपण भिडे गुरुजींना ओळखत नसल्याची साक्ष दिली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. तथापि, गुरुजींविरोधात काही नवे पुरावे आले असून त्याचा तपास करून आठ दिवसांत पुढील कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
राज्यातील कायदा सुवव्यवस्थेवर विरोधकांनी उपस्थित केलेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, कोरेगाव-भीमा प्रकरणी सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही. माझा घरातील व्यक्ती जरी यात सहभागी असला तरी त्याला सोडले जाणार नाही. भिडे गुरुजींच्या अटकेसाठी आग्रही असणारे अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा झाली असून त्यांनी काही तपशील दिला आहे. त्यांनी एक फेसबूक पोस्ट दाखवली असून त्याचा तपास आठ दिवसांत केला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
न्या. लोया यांचा नागपुरात मृत्यू झाला त्यात संशयास्पद काहीही नव्हते. एका वेबसाईटने त्यांच्या मृत्यूविषयी धादांत खोटी आणि विसंगत अशी माहिती प्रसिद्ध केली. लोया यांच्या कुटुंबीयांनीही त्यांच्या मृत्यूबाबत कुठलाही संशय व्यक्त केलेला नाही. हे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
भिडे गुरुजींना मुख्यमंत्र्यांनी क्लीनचिट दिली असली तरी बुधवारी सांगलीत मोर्चा निघणारच.
- शिवप्रतिष्ठान