भीमा कारखाना; महाडिकांचे वर्चस्व
By Admin | Published: March 16, 2016 08:36 AM2016-03-16T08:36:59+5:302016-03-16T08:36:59+5:30
सोलापूरसह कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत विद्यमान चेअरमन धनंजय महाडिक
मोहोळ (सोलापूर) : सोलापूरसह कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत विद्यमान चेअरमन धनंजय महाडिक यांनी ४८३४ एवढ्या मोठ्या फरकाने परिचारक-पाटील यांच्या परिवर्तन पॅनलचा पराभव करून निर्विवाद वर्चस्व मिळवले़
भीमा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आरोप-प्रत्यारोपांनी गाजली होती़ माजी आमदार सुधाकरपंत परिचारक व जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजन पाटील यांनी भीमाच्या कारभाराचे वाभाडे काढत भ्रष्टाचार व कर्जाचे आरोप केले होते़ परंतु चेअरमन धनंजय महाडिक यांनी कारखान्याचा
केलेला विकास, विस्तारीकरण, को-जन. असे प्रमुख मुद्दे प्रचारात जोरकसपणे मांडले़ सभासदांनीही त्यांच्या या कामाला प्रचंड
प्रतिसाद देत त्यांच्या मतांचा भरभरून वर्षाव करून पसंतीची मोहोर उमटवली़
पहिल्या फेरीत पुळूज गटापासून घेतलेले मताधिक्य वाढत वाढत शेवटच्या फेरीपर्यंत कायम राहून ४८३४ एवढ्या जादा मताधिक्याने परिचारक-पाटील आघाडीवर मात करीत विजय संपादन केला़
भीमा परिवाराच्या शेतकरी विकास आघाडीचे नेते धनंजय महाडिक यांच्यासह १४ उमेदवारांना सुमारे १० हजारांहून अधिक मते मिळाली़ तर विरोधी परिचारक-पाटील आघाडीच्या उमेदवारांना ५७०० मतांवर समाधान मानावे लागले़