भीमा कोरेगाव हिंसाचारासाठी भिडे गुरुजी आणि हिंदू एकता आघाडीला धरले जबाबदार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2018 04:24 PM2018-01-02T16:24:46+5:302018-01-02T19:46:10+5:30
पुण्यात भीमा कोरेगाव आणि सणसवाडी येथे झालेल्या हिंसाचाराचे खापर संभाजी भिडे यांचे शिव प्रतिष्ठान आणि मिलिंद एकबोटे यांच्या हिंदू एकता आघाडीवर फोडण्यात आले आहे.
मुंबई - पुण्यात भीमा कोरेगाव आणि सणसवाडी येथे झालेल्या हिंसाचारासाठी संभाजी भिडे यांचे शिव प्रतिष्ठान आणि मिलिंद एकबोटे यांच्या हिंदू एकता आघाडीला भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी जबाबदार धरलं आहे. प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन हे आरोप केले आहेत.
शिव प्रतिष्ठान आणि हिंदू एकता आघाडीच्या कार्यकर्त्यांनी भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाकडे निघालेल्या जमावावर दगडफेक केली आणि हिंसाचार सुरु झाला असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. या घटनेचा विजयस्तंभावर आलेल्या लोकांशी काहीही संबंध नाहीय. प्रशासन आणि गावक-यांच्या वादातून ही घटना घडली.
भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. शांततेत उद्या महाराष्ट्र बंद पाळावा असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. . सर्वसामान्यांना त्रास होईल असं काही करु नका असं म्हटलं आहे.
महाराष्ट्र लोकशाही आघाडी, डावी लोकशाही आघाडी, जातीमुक्त आंदोलन परिषद, एल्गार परिषदेसाठीच्या अडीचशे संघटनांचे फ्रंट, संभाजी ब्रिगेड आदी संघटनांनी बंदचे आवाहन केलं आहे.'त्यादिवशी ग्रामीण एसपींना फोन करत होतो, पण आऊट ऑफ कव्हरेज होते. पोलिसांनी हलगर्जीपणा केल्याचा माझा आरोप आहे', असं प्रकाश आंबेडकर बोलले आहेत. यावेळी त्यांनी पोलिसांची कुमक घटनास्थळी उशिरा पोहोचल्याचा आरोप केला. तसंच कोरेगाव-चाकणपर्यंतच्या गावांचं अनुदान बंद करावं अशी मागणीही केली.