भीमा कोरेगाव प्रकरण : मास्टर माईंड शोधून काढा - संभाजी ब्रिगेड
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2018 03:44 PM2018-01-02T15:44:59+5:302018-01-02T15:48:00+5:30
शौर्य दिनाला 200 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्य शहीद स्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो बहुजन बांधव तेथे एकञ झालेले होते. त्यामध्ये
मुंबई - भीमा-कोरेगाव विजयदिनाच्या कार्यक्रमानंतर सणसवाडी येथे झालेल्या हिंसाचाराचे आज राज्यभर पडसाद उमटले आहेत. शौर्य दिनाला 200 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्य शहीद स्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो बहुजन बांधव तेथे एकञ झालेले होते. त्यामध्ये सर्वच पुरोगामी संघटनांचे कार्यकर्ते सुध्दा उपस्थित होते. परंतु विकृत प्रवृत्तीच्या काही लोकांनी अनेक दिवसांपासून जाणीवपूर्वक षडयंत्र रचून 1 जानेवारीच्या कार्यक्रमावर जो हल्ला केला त्याचा जाहीर निषेध करीत आहे. असे संभाजी ब्रिगेड तर्फे जाहीर करण्यात आहे.
दलित,मराठा,ओबीसी व समस्त बहुजन बांधवांना अशी विनंती करीत आहे की, सर्वांनी एकञितपणे या विकृत घटनेचा निषेध करावा. तसेच या घटनेमागे जो " मास्टर माईंड " आहे त्याचा पोलिसांनी आधी शोध घेवून त्याचे नाव जनतेसमोर जाहीर करावे. असे आवाहनही संभाजी ब्रिगेड तर्फे करण्यात आलं आहे.
या घटनेमागील मास्टमाईंड शोधल्यास दोन समाजात विनाकारण निर्माण होणारे गैरसमज व अफवा थांबतील. आपण सर्व परिवर्तनवादी लोकांनी शांत डोक्याने व नियोजनपूर्वक या प्रसंगाचा सामना करायचा आहे. त्यामुळे कोणीही भडकावू वक्तव्य न करता आपले पूर्ण लक्ष दोन समाजात वितुष्ट निर्माण करणा-या मास्टर माईंडला शोधून काढणा-यावर केंद्रित करावे. असे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ॲड.मनोज आखरे यांनी म्हटलं आहे.
सोशल मीडियावर अफवा पसरवणा-यांवर कारवाई करू - मुख्यमंत्री
भीम कोरेगाव प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांकडून चौकशी होणार आहे. या घटनेत ज्या युवकाचा मृत्यू झाला. त्याची हत्या समजून सीआयडीमार्फत चौकशी केली जाणार आहे. याचबरोबर, मृताच्या नातेवाईकांना दहा लाख रुपयांची मदत राज्य सरकारकडून केली जाणार आहे. राज्यभरात ज्याठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या, त्याठिकाणी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. तसेच, अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवणाऱ्यांवर कारवाई करु, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
सोशल मीडियावर पोस्ट करण्यापूर्वी माहिती पडताळून घ्या - मुंबई पोलीस
भीमा कोरेगाव प्रकरणाचे राज्यभरात हिंसक पडसाद उमटले आहेत. मुलुंड, कुर्ला परिसरात बेस्ट बसची तोडफोड करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मुंबई पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे आवाहन पोलिसांकडून नागरिकांना करण्यात आले आहे. तसंच सोशल मीडियावर काहीही पोस्ट करण्यापूर्वी माहितीची खात्री करुन घेतल्यानंतरच पोस्ट करावे, असेही सांगण्यात आले आहे.
जाणून घ्या काय आहे भीमा-कोरेगाव प्रकरण?
पुणे-नगर महामार्गावरील भीमा-कोरेगावमध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर तरुणांनी रॅली काढली. त्याचवेळी पुण्याकडून कोरेगावच्या दिशेने आंबेडकरी अनुयायी येत होते. रस्त्यावरील गर्दीतून झालेल्या किरकोळ बाचाबाचीचे पर्यवसान दगडफेक व जाळपोळीत झालं.
सोमवारी भीमा कोरेगावच्या रणसंग्रामाला 200 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विजय दिवस साजरा होत असताना, तिथूनच जवळ असणाऱ्या सणसवाडी गावाच्या परिसरात दोन गटांमध्ये वाद उफाळला.
सणसवाडीतील वादाचं पर्यवसान हाणामारीमध्ये झालं आणि त्यातून अनेक गाड्यांची तोडफोड, जाळपोळ आणि दगडफेक झाली.
दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एकाचा मृत्यू झाला आहे. घटनेचे पडसाद मराठवाड्यातही उमटले.