Koregaon Bhima Case : भिडे, एकबोटेंना पाठिशी घालणाऱ्यांची चौकशी करा; आंबेडकरांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2019 11:33 AM2019-12-26T11:33:34+5:302019-12-26T11:55:25+5:30
Koregaon Bhima Case : तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भूमिकेवर आंबेडकरांकडून अप्रत्यक्षपणे शंका उपस्थित
मुंबई: भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटेंना पाठिशी घालणाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली. पोलीस अधिकाऱ्यांना दोषी धरुन या प्रकरणातून निसटण्याचा प्रयत्न काही जण करत आहेत. मात्र त्यावेळी पोलिसांना सूचना देणाऱ्यांचीदेखील चौकशी व्हायला हवी, असं आंबेडकर म्हणाले.
भीमा कोरेगावात झालेल्या हिंसाचाराची जबाबदारी पोलीस अधिकाऱ्यांवर टाकून स्वत: नामानिराळं राहण्याचा काहींचा प्रयत्न आहे. मात्र त्यावेळी पोलिसांना कारवाईचे आदेश देणाऱ्यांची चौकशी होणं गरजेचं आहे. त्यासाठीच मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती, असं आंबेडकर म्हणाले. दंगल झाल्याशिवाय मुख्यमंत्री बदलला जात नाही, असा आधीचा पायंडा होता. मात्र आता सरकार आणायचं असल्यास दंगल व्हावी लागते, असंदेखील त्यांनी पुढे म्हटलं.
भीमा-कोरेगावत झालेल्या हिंसाचार प्रकरणात संभाजी भिडे, मिलिंद एकबोटेंवर मोक्का का लावण्यात आला नाही? त्यांनी कोणी वाचवलं?, असे प्रश्न उपस्थित आंबेडकरांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. एक जानेवारीला भीमा-कोरेगावला जायचं की नाही, याबद्दलचा निर्णय अद्याप घेतलेला नाही. मात्र भीमा-कोरेगावला वंदन करण्यासाठी जाणाऱ्यांनी शांतता पाळावी, असं आवाहन त्यांनी केलं.
आंबेडकरांनी राष्ट्रीय नागरिकत्व कायद्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांचा समाचार घेतला. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा एनआरसीवरुन खोटं बोलत असल्याचा आरोप त्यांनी केला. एनआरसीबद्दल मंत्रिमंडळात, संसदेत कधीच चर्चाच झाली नसल्याचं मोदी भरसभेत सांगतात. मग अमित शहा लोकसभेत एनआरसी लागू करणार असल्याची घोषणा कशी काय करतात, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. एनआरसी, सीएएबद्दलची आमची भूमिका मुस्लिमकेंद्री नसून भारतकेंद्री असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
एनआरसीचा फटका केवळ मुस्लिमांना बसणार नाही. तो हिंदूंनादेखील बसेल, असं म्हणत आंबेडकर यांनी आसाममध्ये राबवण्यात आलेल्या एनआरसीचं उदाहरण दिलं. आसाममध्ये करण्यात आलेल्या एनआरसीमध्ये १९ लाख लोक घुसखोर ठरले. त्यातले १४ ते १५ लाख हिंदू आहेत. त्यामुळे एनआरसीचा फटका हिंदूंनादेखील बसणार हे उघड आहे, असं आंबेडकर म्हणाले.
मोदी सरकारला काही लोकांना बाद करायचं असल्यानंच एनआरसीचा घाट घालण्यात येत असल्याचा थेट आरोप त्यांनी केला. 'काही लोकांना डिटेन्शन सेंटरमधून पाठवून त्यांचा मताधिकार काढून घ्यायचा आहे. हाच सरकारचा एनआरसीमागचा हेतू आहे. संघाची, भाजपाची विचारसरणी रुजवण्यासाठी हा सगळा खटाटोप केला जात आहे,' असं आंबेडकर यांनी सांगितलं.