भीमा कोरेगाव दंगलीत हेतुपुरस्सर गुन्हे नोंदविले; धनंजय मुंडेंचेही मुख्यमंत्र्यांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2019 06:42 PM2019-12-03T18:42:18+5:302019-12-03T18:50:13+5:30
भाजपा सरकारने बुद्धीजीवी, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते आणि निरपराधांना नक्षलवादी ठरवून त्यांच्यावर खटले भरले आहेत.
मुंबई : महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदभार स्वीकारताच मेट्रोच्या आरेमधील कारशेडला स्थगिती दिली होती. यानंतर आंदोलकांवरील गुन्हेही रद्द केले होते. तसेच भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी नाणार आंदोलकांवरील गुन्हेही मागे घेण्याची मागणी केली होती. यावर ठाकरेंनी सकारात्मक पाऊल उचलले होते. आता राष्ट्रवादीच्या विधानपरिषद आमदारांनंतर धनंजय मुंडेंनीही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी गुन्हे मागे घेण्याची मागणी केली आहे.
राष्ट्रवादीच्या विधानपरिषद आमदाराने भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील दलितांवरील गुन्हेही माफ करण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे ही मागणी गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडियावर केली जात होती. याबाबतचे पत्रच प्रकाश गजभिए यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविले असून त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याची विनंती केली आहे.
यानंतर काही वेळातच धनंजय मुंडे यांनी ट्विट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठविल्याचे म्हटले आहे. ''भीमा कोरेगाव दंगलीत सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांविरुद्ध तत्कालीन भाजप सरकारने हेतुपुरस्सर नोंदवलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली. भाजप सरकारच्या अत्याचारात बळी ठरलेल्यांना न्याय देण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी करावे.'', असे ट्विट त्यांनी केले आहे.
Nationalist Congress Party MLC Prakash Gajbhiye has written to Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray 'seeking withdrawal of cases filed against dalits in the Bhima Koregaon violence' pic.twitter.com/kCw42FQhrr
— ANI (@ANI) December 3, 2019
यामध्ये मुंडे यांनी म्हटले आहे की, तत्कालीन भाजपा सरकारने बुद्धीजीवी, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते आणि निरपराधांना नक्षलवादी ठरवून त्यांच्यावर खटले भरले आहेत. हे हेतूपुरस्सर असून तातडीने हे गुन्हे मागे घ्यावेत. तसेच भाजपा सरकारच्या कारकीर्दीमध्ये व्यक्ती आणि विचारस्वातंत्र्याची नेहमीच मुस्कटदाबी केली गेली. सरकारविरोधात आवाज उठविणाऱ्यांचा जाणीवपूर्वक छळ केला गेला. भाजप सरकारच्या अत्याचारांना बळी पडलेल्यांना न्याय मिळायला हवा अशी टीका केली आहे.
भीमा कोरेगाव दंगलीत सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांविरुद्ध तत्कालीन भाजप सरकारने हेतुपुरस्सर नोंदवलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली. भाजप सरकारच्या अत्याचारात बळी ठरलेल्यांना न्याय देण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी करावे. #BhimaKoregaon@CMOMaharashtrapic.twitter.com/Jve8fMVw1r
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) December 3, 2019