आजीचं 'पुस्तकांचे हॉटेल'! अभिनव चळवळीतून करतात मराठी भाषेचं संवर्धन; शासन करणार गौरव
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 10:46 IST2025-02-27T10:26:53+5:302025-02-27T10:46:58+5:30
वाचनसंस्कृती आपल्या घरापासून झाली पाहिजे. मी स्वतः आजही या वयात वाचन करते. दैनिकाचे पहिले आणि शेवटचे पान वाचून काढते.

आजीचं 'पुस्तकांचे हॉटेल'! अभिनव चळवळीतून करतात मराठी भाषेचं संवर्धन; शासन करणार गौरव
नाशिक - वाचन चळवळ वाढावी आणि प्रत्येक नागरिकाने पुस्तके वाचली पाहिजेत यातून आपल्या मराठी भाषेचे जतन होईल, या उद्देशाने भीमाबाई जोंधळे या आजीबाईंनी 'पुस्तकाचे हॉटेल' सुरू केले. त्यांच्या या अभिनव हॉटेलमध्ये विविध वाङ्मयीन प्रकारातील सुमारे सहा ते सात हजार पुस्तके आहेत. हॉटेलात येणारा प्रत्येक जण पुस्तके चाळतो, वाचतो. त्यामुळे आपला उद्देश सफल होत असल्याचे आजीबाई सांगतात.
नव्या पिढीला वाचनाकडे वळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या भीमाबाई जोंधळे यांना नुकताच राज्य शासनाचा भाषा संवर्धन पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याचे वितरण गुरुवारी मुंबईत होत आहे. त्यांनी पुत्र प्रवीण व नात अवनी यांच्यासह नाशिक लोकमत कार्यालयाला मंगळवारी भेट दिली. कार्यकारी संपादक मिलिंद कुलकर्णी यांनी स्वागत केले.
लोकांनी वाचले पाहिजे, असे का वाटले?
मोबाइल वापराच्या जमान्यात लोक पुस्तकांपासून दुरावलेत, वाचन कमी झाले. मोबाइल गरजेचा असला तरी त्याचा वापर काहीसा कमी करून लोकांनी पुस्तकांकडे वळावे, पुस्तके वाचावित यासाठी ओझरजवळील दहावा मैल येथे 'पुस्तकांचे हॉटेल' सुरू केले. वाचनसंस्कृती आपल्या घरापासून झाली पाहिजे. मी स्वतः आजही या वयात वाचन करते. दैनिकाचे पहिले आणि शेवटचे पान वाचून काढते.
मराठी भाषा संवर्धन पुरस्कार मिळाल्याबद्दल काय वाटते?
खूप समाधान वाटले. कोणताही प्रस्ताव पाठविला नव्हता, की कोणतीही शिफारस नाही. शासनाकडून थेट पुरस्कार जाहीर झाल्याचे खास 'लोकमत'कडून समजले आणि खूप आनंद झाला. त्यांनीच सर्वप्रथम बातमीही छापली. मुख्यमंत्र्यांचा फोटो रोज दैनिकात पाहायचे, आता प्रत्यक्ष त्यांच्या हातून पुरस्कार घेणार असल्याने आनंद वाटतो.
आजवर आपणास अनेक लोक भेटले त्यांचे काही अनुभव ?
पुस्तकाचे हॉटेलात येणाऱ्यांनी दिलेल्या भेटी आणि लिहिलेले अभिप्राय यांचे एखादे पुस्तक होऊ शकेल इतके त्यांनी वाचनाच्या या चळवळीविषयी लिहिले आहे. आपले काम पाहून नाशिकरोड येथील १०१ वर्षांचे तापसे बाबा आवर्जून भेटायला आले आणि त्यांनी हे काम पाहून त्यावर एक कविता सादर केली. एक दिव्यांग व्यक्ती स्वतः रिक्षा करून खास भेटायला आली, तर डॉ. भरत केळकर यांच्या मातोश्रींनी आग्रह केल्याने डॉक्टर स्वतः त्यांना व्हीलचेअखर घेऊन हॉटेलात आले होते. असे अनेक प्रसंग आहेत.
हॉटेल सुरू केले तेव्हा काही अडचणी आल्यात का?
कष्ट खूप केले ते अजूनही संपलेले नाही. सुरुवातीला काहींनी नावे ठेवली. पाटलाच्या घरातील बाई कपबशा धुते असे म्हणून टीका करायचे, परंतु आज तेच आपले कौतुक करतात, पुरस्कार मिळाला तेव्हा मोबाइलवर स्टेटस ठेवले. हॉटेलात लांबून येणारे ग्राहक जेंव्हा पुस्तके चाळतात, वाचतात आणि आवर्जून पुस्तके घेतात तेंव्हा खुप समाधान वाटते.
आपण कोरोना काळातही सामाजिक सेवा केलीय, त्याविषयी काय सांगाल.
होय, कोरोना काळातच नाही तर नोटाबंदीच्या काळातही पैसे नसतील तरी लोकांना खायला घातले. कोरोनात गावाकडे पायी निघालेल्यांसाठी चहा बनवून दिला.नोटाबंदीच्या काळात ज्यांच्याकडे पैसे नाहीत अशांसाठी 'या जेवण करा, जमेल तेव्हा पैसे द्या' असा उपक्रम राबविला. त्यावेळी अनेक चालकांना पोटभर अन्न देऊ शकले.