भीमाशंकरला दिसतोय ‘हरियाल’ तर जुन्नरमध्ये ‘नीलकंठ’
By admin | Published: March 3, 2017 01:04 AM2017-03-03T01:04:48+5:302017-03-03T01:04:48+5:30
महाराष्ट्राचा राज्यपक्षी म्हणून ओळख असणाऱ्या ‘हरियाल’ या पक्ष्याचे भीमाशंकर परिसरात वास्तव्य दिसू लागले आहे.
कांताराम भवारी, अशोक खरात
डिंभे- महाराष्ट्राचा राज्यपक्षी म्हणून ओळख असणाऱ्या ‘हरियाल’ या पक्ष्याचे भीमाशंकर परिसरात वास्तव्य दिसू लागले आहे. सध्या पोखरी घाटाच्या पायथ्याशी गोहे पाझर तलावाच्या परिसरात या पक्ष्यांचे थवे मार्च-एप्रिलच्या दरम्यान पाहावयास मिळत आहेत. वडाच्या झाडांची फळे परिपक्व होऊ लागताच या परिसरात ‘हरियाल’ दिसत आहेत.
हरियाल पक्ष्यांच्या संरक्षण व संवर्धनासाठी परिसरातील त्यांची वसतीस्थाने विकसीत करण्याची गरज भासू लागली आहे. ‘हरियाल’ (हिरवे कबूतर) हा पक्षी राज्यपक्षी म्हणून ओळखला जातो. ‘ट्रेशन फोनिकोप्टेरा’ असे या पक्ष्याचे शास्त्रीय नाव आहे. गर्द हिरव्या झाडांची ठिकाणे, प्रामुख्याने वड, पिंपळ, उंबर, अंजीर या सारख्या झाडांच्या सान्निध्यात या पक्ष्यांचे वास्तव्य असल्याचे पाहावयास मिळते. हा कबूतर वंशीय पक्षी आहे. हरियाल महाराष्ट्राचे मानचिन्ह म्हणून ओळखला जातो. निळसर कबूतराच्या आकाराचा, मजबूत बांध्याचा हा पक्षी आहे. रंग पिवळा, आॅलिव्ह-हिरवा आणि राखट करडा, खांद्यावर जांभळ्या रंगाचा डाग असतो. याचे पिवळे पोट ही याला ओळखण्याची मुख्य खूण आहे.
सकाळी लवकर किंवा संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी हे पक्षी अन्न मिळविण्यासाठी बाहेर पडतात. फळांनी लगडलेल्या फांदीवर हा पक्षी अतिशय कुशलपणे फळे तोडताना दिसतो. जरासाही धोका जाणवल्यास जागच्या जागी थिजून थांबतो. झाडात याचा रंग इतका बेमालूमपणे मिसळतो, की तो सहजासहजी दिसत नाही. सध्या भीमाशंकर व परिसरात जंगलातील वडाच्या झाडांना लालबुंद फळे लगडली आहेत. ही फळे परिपक्व झाल्याने या जंगलमेव्याचा आस्वाद लुटण्यासाठी अनेक जातीचे पक्षी या झाडांकडे आकर्षित होत असल्याचे पाहावयास मिळत आहे. आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील पोखरी घाटाच्या पायथ्याशी गोहे पाझर तलावाजवळ अनेक वडाची झाडे आहेत.
सध्या ही झाडे फळांनी लगडली असून या लगडलेल्या फळांचा आस्वाद घेण्यासाठी सध्या हरियालचे वास्तव्य या परिसरात असल्याचे पाहावयास मिळते. घाटातील पहिल्या वळणावरील झाडांवर या पक्ष्यांचे
थवे विसावले आहेत.
> खोडद
नीलकंठ म्हणजेच निळ्या गळ्याचा किंवा शंकर म्हणूनही ओळखला जाणारा हा नीलकंठ नावाचा पक्षी सध्या जुन्नर तालुक्यात विहार करताना दिसतोय. विशेष म्हणजे आॅक्टोबर ते मार्च या कालावधीत हा पक्षी भारतात वास्तव्य करतो आणि महाशिवरात्री झाल्यानंतर हा नीलकंठ भारतातून निघून जातो, असे म्हटले जाते.
नीलकंठ पक्षाचा छाती आणि गळाही अगदी निळा असल्यामुळे त्याला शंकराच्या नावाने ओळखले जाते. केवळ या पक्षाचे नाव हे नीलकंठ असल्यामुळे संपूर्ण भारत देशात या पक्षाची कोणीही चुकूनही हत्या करत नाही. हा नीलकंठ नॉर्थ युरोशिया व लडाख येथून महाराष्ट्रात येतो.
नीलकंठबाबत माहिती देताना खोडद येथील पर्यावरण अभ्यासक सुभाष कुचिक म्हणले, की ‘या पक्ष्याला मराठीत नीलकंठ व शंकर म्हणतात, संस्कृतमध्ये श्याम कलह म्हणतात तर इंग्रजीत ब्ल्यू थ्रोट म्हणतात. नीलकंठ मध्यम आकाराचा व चिमणीएवढा असतो तर मादी फिकट काळ्या रंगाची असते. तो उत्तरेकडून भारतीय उपखंडात हिवाळ्यात येतो.
सध्या जुन्नर तालुक्यात हा पक्षी नद्या, नाले, पाण्याजवळची झुडपे, गवताळ प्रदेश या ठिकाणी हा नीलकंठ दिसत आहे. भारतभर मिळालेल्या पाहुणचारामुळे तो आनंदी असतो. मार्च ते जुलैमध्ये त्यांचा विणीचा हंगाम असतो. हिवाळ्यात शांत आणि लाजाळू असणारा हा नीलकंठ विणीच्या हंगामात अत्यंत आक्रमक व सुंदर गाणारा बनतो.’