भीमा-कोरेगाव दंगलीप्रकरणी धरपकड सुरू; सुधीर ढवळेंसह तीन जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2018 08:06 AM2018-06-06T08:06:10+5:302018-06-06T08:18:07+5:30
कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी एल्गार परिषदेचे आयोजक सुधीर ढवळे यांच्यासह तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
पुणे : कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी एल्गार परिषदेचे आयोजक सुधीर ढवळे यांच्यासह तीन जणांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. सुधीर ढवळे यांना सकाळी सहा वाजता पुण्याच्या विश्रामबाग पोलिसांनी गोवंडी येथील त्यांच्या घरुन ताब्यात घेतले आहे. सध्या गोवंडीमधील देवनार पोलीस ठाण्यात त्यांचा जबाब नोंदविण्याची प्रक्रिया सुरु असून, त्यांना पुढील कारवाईसाठी पुण्याला घेऊन जाण्याची शक्यता आहे. काही महिन्यांपूर्वी पुणे पोलिसांनी त्यांचा घराची झाडा झडती घेतली होती आणि आज त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
सुधीर ढवळे यांच्याशिवाय नागपूर येथील वकील सुरेंद्र गडलींग यांना नागपूरातून पोलिसांनी अटक केली आहे. तर माओवाद्यांचे नेते रोना विल्सन यांना दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. पुण्यातील शनिवारवाडा येथे 31 डिसेंबर 2017 रोजी एल्गार परिषदेचे आयोजन केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषण झाली होती.
संभाजी भिडेंना अटक न करता भीमा कोरेगाव शौर्य प्रेरणा अभियानाच्या आयोजकांना अटक झाल्याचा निषेध नोंदवण्यासाठी समर्थक देवनार पोलीस स्थानकाबाहेर जमायला सुरुवात झाली आहे.
कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला २०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने पुण्यात ३१ डिसेंबर २०१७ रोजी शनिवारवाड्यावर एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी, जेएनयुचा विद्यार्थी नेता उमर खालीद, माजी न्यायमूर्ती बी़ जी़ कोळसे पाटील आणि प्रकाश आंबेडकर आदि सहभागी झाले होते. या एल्गार परिषदेच्या सुरुवातीला कबीर कला मंचच्या कार्यकर्त्यांनी सुरुवातीला सादर केलेल्या गीतातून लोकांना चेतवल्याचा आरोप करण्यात आला. याप्रकरणी ७ जानेवारीला विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या एल्गार परिषदेनंतर दुस-या दिवशी कोरेगाव भीमा येथे दंगल झाली ही दंगल घडवून आणण्यात नक्षलवाद्याचा हात असल्याचा आरोप करण्यात आला होता.
काय आहे भीमा-कोरेगाव प्रकरण?
पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव-भीमामध्ये ता.1 जानेवारी 2018 रोजी किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर तरुणांनी रॅली काढली. त्याचवेळी पुण्याकडून कोरेगावच्या दिशेने आंबेडकरी अनुयायी येत होते. रस्त्यावरील गर्दीतून झालेल्या किरकोळ बाचाबाचीचे पर्यवसान दगडफेक व जाळपोळीत झालं. सणसवाडीतील वादाचं पर्यवसान हाणामारीमध्ये झालं आणि त्यातून अनेक गाड्यांची तोडफोड, जाळपोळ आणि दगडफेक झाली.