बाबासाहेबांच्या स्मारकाच्या निमंत्रणासाठी भाजपाचा भीमरथ
By admin | Published: October 6, 2015 03:35 AM2015-10-06T03:35:00+5:302015-10-06T03:35:00+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ आॅक्टोबर रोजी इंदू मिल येथील जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतराष्ट्रीय स्मारकाच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पडणार आहे.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ आॅक्टोबर रोजी इंदू मिल येथील जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतराष्ट्रीय स्मारकाच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पडणार आहे. भूमिपूजन सोहळा आणि त्यानंतर वांद्रा-कुर्ला संकुलातील जाहीर सभेचे आमंत्रण देण्यासाठी भाजपाने भीमरथ तयार केला आहे. मुंबईतील १४० वस्त्यांमध्ये हा भीमरथ फिरणार आहे.
भूमिपूजन समारंभाला लाखो नागरिकांनी उपस्थित राहावे अशी भाजपाची संकल्पना असून, त्याचे आमंत्रण घराघरांत जाऊन देण्यासाठी भीमरथ तयार करण्यात आला आहे. मुंबई भाजपाध्यक्ष आ. आशिष शेलार यांनी सोमवारी या रथाचे उद्घाटन केले. भाजपाचे आ. भाई गिरकर यांच्या नेतृत्वाखाली १० आॅक्टोबरपर्यंत मुंबईतील कानाकोपऱ्यांत हा रथ दौडणार आहे. हा एक ऐतिहासिक क्षण असून, या दिवशी गेल्या अनेक वर्षांच्या स्वप्नाला पंतप्रधान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मूर्त स्वरूप येणार आहे. यापूर्वीच्या सरकारने कधी जागेचे तर कधी कायद्याचे तर कधी चर्चेचे अडथळेच निर्माण केले. पण भाजपा सरकारने निष्ठेने पहिल्या एका वर्षातच स्मारकाचा मार्ग मोकळा केल्याचे आशिष शेलार म्हणाले.
भीमरथाच्या नावाखाली भाजपाकडून फसवणूक - मलिक
भाजपा हा रथाच्या नावाखाली लोकांची फसवणूक करणारा पक्ष आहे. पहिल्यांदा रामरथ काढून लोकांची फसवणूक केली.
आता भीमरथ काढून लोकांची फसवणूक करण्याचा नवा कार्यक्रम आखण्यात आल्याची टीका राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली.
या स्मारकाचा निर्णय आघाडी सरकारच्या काळात घेण्यात आला होता. बिहार निवडणुकीच्या तोंडावर ११ तारखेला स्मारकाच्या भूमिपूजनाचा घाट घालण्यात आल्याची टीका मलिक यांनी केली.
बाबासाहेबांना नाकारणाऱ्यांनी टीका करू नये - भाई गिरकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना नाकारणाऱ्यांनी भाजपावर टीका करू नये. या भव्यदिव्य स्मारकाचा ऐतिहासिक सोहळा मुंबईत होतोय, त्याच्या निमंत्रणासाठी हा भीमरथ आहे. आघाडीच्या काळात केवळ स्मारकासमोरील अडचणींचा पाढाच वाचण्यात आला. कधी एनटीपीसी तर पर्यावरणाची अडचण सांगण्यात आली; पण भाजपा सरकारने वर्षभरात सर्व अडचणींवर मात केल्याचे गिरकर म्हणाले.