भीष्मराज बाम यांचे निधन

By Admin | Published: May 13, 2017 02:46 AM2017-05-13T02:46:33+5:302017-05-13T02:46:33+5:30

माजी अतिरिक्त पोलीस महासंचालक व ज्येष्ठ क्रीडा मानसोपचारतज्ज्ञ भीष्मराज बाम (७९) यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने शुक्रवारी

Bhishmaraj Bam passed away | भीष्मराज बाम यांचे निधन

भीष्मराज बाम यांचे निधन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : माजी अतिरिक्त पोलीस महासंचालक व ज्येष्ठ क्रीडा मानसोपचारतज्ज्ञ भीष्मराज बाम (७९) यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने शुक्रवारी सायंकाळी येथे निधन झाले. मानसोपचारातील भीष्म असणाऱ्या बाम यांनी भारतातील क्रीडापटूंना मानसिकदृष्ट्या सक्षम करण्याचे शिवधनुष्य उचलले होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे, दोन बहिणी असा परिवार आहे. शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता त्यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रा निघेल. बाम हे योग विद्येसंदर्भात महात्मा सभागृहात व्याख्यान देत असतानाच कोसळले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. विश्वविक्रमवीर सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आदी क्रिकेटपटूंसह आॅलिम्पिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रा यांची कामगिरी उंचावण्यात त्यांनी मोलाचा वाटा उचलला. नेमबाज अंजली भागवत, सुमा शिरूर, गगन नारंग तसेच विश्वविक्रमवीर बिलियर्डसपटू गीत सेठी, धावपटू कविता राऊत यांच्यासह शेकडो खेळाडूंना मानसिक एकाग्रता आणि अन्य प्रकारचे मार्गदर्शन भीष्मराज बाम यांनी केले. राज्य शासनाने त्यांना २०११-१२ वर्षासाठीचा शिवछत्रपती पुरस्कार देऊन गौरविले होते.
बाम यांनी सेवानिवृत्तीनंतर भारतीय योगशास्त्राचा अभ्यास केला आणि त्यातून क्रीडा मानसोपचार विषयावर प्रभुत्व मिळविले. राष्ट्रकुल स्पर्धेसाठीच्या नेमबाजी संघासह मुंबई रणजी संघाचे मानसोपचार सल्लागार म्हणून त्यांनी काम पाहिले
होते.
विजयाचे मानसशास्त्र, मार्ग यशाचा, संधीचे सोने करण्याची इच्छाशक्ती, मना सज्जना आणि विनिंग हॅबीटस् ही त्यांची पुस्तके गाजली. विनिंग हॅबीटस् या पुस्तकाचा १२ भाषांमध्ये अनुवाद प्रकाशित करण्यात आला आहे.

Web Title: Bhishmaraj Bam passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.