भिवंडी: नालेसफाईवर कोट्यावधींची उधळण करूनही शहर पाण्याखालीच; ठेकेदारांवर कारवाई करणार का?, नागरिकांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2021 06:08 PM2021-06-09T18:08:45+5:302021-06-09T18:09:11+5:30
Heavy Rainfall : भिवंडीत अनेक ठिकाणी साचलं होतं पाणी.
नितिन पंडीत
भिवंडी महापालिका क्षेत्रामध्ये प्रत्येक वर्षी नालेसफाईच्या कामांवर कोट्यावधी रुपये खर्च करूनही शहरातील सखल भागांसोबतच रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्याच्या घटना बुधवारी कोसळलेल्या मुसळधार पावसाने शहरातील नागरिकांनी अनुभवल्या. शहरात ठिकठिकाणी पाणी साचल्याने महानगरपालिकेचा नाले सफाईचा दावा फोल ठरला असून कोट्यावधींच्या उधळणी नंतरही शहर पाण्याखाली गेल्याने मनपा प्रशासनाबरोबरच लोक प्रतिनिधींविरोधात नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.
या वर्षी कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमुळे अर्धा मे महिना उलटून गेला असतांनासुद्धा नालेसफाईची निविदा प्रक्रिया काही पूर्ण झाली नव्हती. केवळ प्रभाग समिती क्रमांक तीन ,चार व पाच या तीन प्रभागांची निविदा प्रक्रिया मे महिन्या अखेरीस झाल्याने तेथील नालेसफाईच्या कामास सुरुवात झाली होती तर उर्वरित प्रभाग समिती क्रमांक एक व दोन ठिकाणी महापालिकेने रोजंदारीवरील मजूर घेऊन नालेसफाईच्या कामाला मनपा कडून सुरुवात केली होती.
भिवंडी शहरात एकूण पाच प्रभाग समिती अंतर्गत ४२ हजार ७३४ मीटर लांबीचे नाले असून त्यापैकी प्रभाग समिती क्रमांक ३, ४, व ५ मधील २५ हजार ६८७ मीटर लांबीचे नाले सफाईच्या कामांचा ठेका देण्यात आला असून, प्रभाग समिती क्र.३ मध्ये १०१५६ मीटर लांबीच्या नाले सफाईचं कंत्राट २१ लाख ४ हजार ४८६ रुपये रक्कमेचा ठेका शुभम कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराला देण्यात आला आहे. प्रभाग समिती क्र.४ मध्ये ८२१४मीटर लांबीच्या नाले सफाईच्या कामाचा २२ लाख ८२ हजार ८१४ रुपयांचा ठेका तुषार मोहन चौधरी या ठेकेदाराला देण्यात आला असून प्रभाग समिती क्र.५ मध्ये असलेल्या ७३१७ मीटर लांबीच्या नालेसफाई कामाचा २३ लाख ५४ हजार ५८७ रुपयांचा ठेका शुभम कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराला देण्यात आला आहे. प्रभाग समिती तीन चार व पाच या तिन्ही प्रभाग समित्यांमध्ये असलेल्या नाले सफाईसाठी मनपा प्रशासनाने ६७ लाख ४१ हजार ८८७ रुपयांचा ठेका तीन कंत्राटदारांना दिला आहे. पैकी प्रभाग तीन व पाच मध्ये शुभम कन्स्ट्रक्शन या एकाच ठेकेदाराला दोन कामांचे ठेके देण्यात आले आहेत. तर प्रभाग समिती एक व दोन याठिकाणी निविदा प्रक्रिया पूर्ण न झाल्याने या दोन प्रभागांमध्ये मनपा प्रशासनाने रोजंदारीवर कामगार घेऊन नालेसफाई सुरू केली आहे. प्रभाग समिती एक व दोन मध्ये १७ हजार ४७ मीटर लांबीच्या नालेसफाईसाठी मनपा प्रशासनाने प्रभाग एक साठी २९ लाख ८ हजार ५८४ रुपये तर प्रभाग दोन साठी २६ लाख ८४ हजार ७६६ अशी एकूण ५५ लाख ९३ हजार ३५० रुपयांची तरतूद केली आहे.
अनेक ठिकाणी साचलं पाणी
अशा प्रकारे मनपा प्रशासनाने महापालिका हद्दीत असलेल्या पाचही प्रभागांसाठी एकूण १ कोटी २३ लाख ३५ हजार २३७ रुपयांचा खर्च होणार आहे. विशेष म्हणजे पावसाळा सुरू झाला तरी महापालिकेचा नाले सफाईचे काम अजूनही पूर्ण झालेले नसल्याने बुधवारी पडलेल्या पावसामुळे शहरात ठिकठिकाणी पाणी साचले होते. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीच ५५.०७ टक्के नालेसफाई झाली असल्याचा दावा मनपा प्रशासनाने व नालेसफाई ठेकेदारांनी केला होता मात्र मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने पहिल्याच दिवशी नाले सफाईचा दावा फॉल ठरवला असून बुधवारी तीनबत्ती भाजी मार्केट, कल्याण रोड,पद्मानगर, निजामपुरा, कणेरी, कमला हॉटेल , नारपोली, शिवाजी नगर भाजी मार्केट, नजराना कंपाऊंड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, कल्याण नाका येथील सखल भागात पाणी शिरल्याने नागरिकांसह व्यावसायिक व दुकानदारांचे मोठे हाल झाले होते तर म्हाडा कॉलनी ईदगाह रोड येथील कामवारी नदीच्या काठी राहणाऱ्या नागरिकांच्या घरात देखील पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल झाले होते.
दरम्यान महापालिका आयुक्त डॉ.पंकज आशिया यांनी नाले सफाई ठेकेदाराने नालेसफाई व्यवस्थित न केल्यास बिल अदा करणार नसल्याचा इशारा दिला होता. त्यामुळे आयुक्त नाले सफाई ठेकदारावर काय कारवाई करणार? याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.