भिवंडी: पैसे चोरीच्या उद्देशाने कंटेनर चालकाचा खून; दोन सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात गुन्हे शाखेस यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2021 08:36 PM2021-06-14T20:36:32+5:302021-06-14T20:36:56+5:30
कंटेनर चालकास लुटीच्या हेतूने आलेल्या दोघा जणांनी हत्या केली असल्याची घटना घडली होती.
नितिन पंडीत
भिवंडी:भिवंडीतील गोदाम भागात माल घेऊन येणाऱ्या वाहन चालकांना लुटण्याच्या घटना परिसरात नेहमीच घडत असताना नारपोली पोलीस ठाणे हद्दीतील काल्हेर येथील गोदाम संकुलनात रात्रीच्या सुमारास कंटेनर चालकास लुटीच्या हेतूने आलेल्या दोघा जणांनी हत्या केली असल्याची घटना घडली होती. याबाबत नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून कोणताही पुरावा नसताना भिवंडी गुन्हे शाखेने अत्यंत शिताफीने तपास करून दोघा जणांना अटक करण्यात यश मिळविले असून त्यामध्ये एका विधिसंघर्षग्रस्त बालकाचा समावेश असल्याची माहिती भिवंडी गुन्हे शाखेने सोमवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत दिली आहे.
२९ मे च्या रात्री राजलक्ष्मी कंपाऊंड काल्हेर येथे नवी मुंबई येथून आझम शाबल अन्सारी (वय २८) हा कंटेनर घेऊन माल घेण्यासाठी येऊन उभा राहिला असता मध्यरात्री च्या सुमारास कंटेनर मध्ये झोपला असता त्या ठिकाणी दुचाकी वरून आलेल्या दोघा आरोपींनी कंटेनर चालकाच्या कॅबिन मध्ये लुटीमरीच्याच्या उद्देशाने घुसून चालका सोबत वाद केला होता. आम्ही गाववाले आहोत आम्ही कोठे ही फिरणार तू कोण विचारणारा, असा दम देखील कंटेनर चालकास आरोपींनी दिला होता. दम दिल्यानंतर दोन्ही आरोपी निघून गेले होते. मात्र काही वेळाने पुन्हा तेथे येऊन आरोपी याने चालकाच्या डोक्यात दगड मारून हत्या केली होती.
या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असता त्याचा समांतर तपास करणाऱ्या भिवंडी गुन्हे शाखा करीत असताना गुन्ह्याबाबत कोणताही पुरावा नसताना फिर्यादी सत्यप्रकाश सदाशिव मिश्रा याने वरील संभाषण गुन्हे शाखेचे वपोनी अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करणारे पो उपनिरी शरद बरकडे व सहा पो उपनिरी लतीफ मन्सूरी यांना सांगितले असता तो धागा पकडून गुन्हे पार्श्वभूमी असलेल्यांची माहिती घेऊन रेकॉर्ड वरील गुन्हेगार किरण नथु पाटील ( वय २० रा.शेलार) यास मिठपाडा येथे सापळा रचून ताब्यात घेत त्याचा अल्पवयीन १७ वर्षीय साथीदार यास सुद्धा ताब्यात घेत त्यांच्या कडे कसून चौकशी केली असता त्याने हत्येची कबुली दिली. त्यांच्याकडे आढळलेल्या तीन मोबाईल ची चौकशी केली असता १० जून रोजी एक गोदामात झोपलेल्या कामगाराचे चोरी केल्याची कबुली आरोपींनी दिल्याने हत्येसह मोबाईल चोरी असे दोन्ही गुन्हे उघडकीस आणले आहेत.
आरोपी किरण पाटील हा सराईत गुन्हेगार असून त्यावर यापूर्वी चोरी घरफोडी असे एकूण सात गुन्हे दाखल असून कोणताही पुरावा नसताना गुन्हे शाखेने संभाषणाचा धागा पकडून हत्येच्या गुन्हेची उकल केल्याने गुन्हे शाखेच्या पथकाचे अभिनंदन करण्यात येत आहे.
सदर गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र जाधव, पोलिस उप निरीक्षक शरद बरकडे, पोलीस उप निरीक्षक रमेश शिंगे, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक लतिफ मन्सुरी, रामसिंग चव्हाण, रविंद्र पाटील, पोलीस हवालदार राजेंद्र चौधरी, प्रविण जाधव, अरूण पाटील, राजेंद्र सांबरे, अनिल पाटील, निता पाटील, मेघना कुंभार, पोलीस नाईक साबीर शेख, प्रमोद धाडवे, सचिन जाधव, रंगनाथ पाटील, श्रीधर हुंडेकरी, पोलीस कॉन्स्टेबल वसंत गवारे, भावेश घरत, रविंद्र सांळुखे यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यास मदत केली असल्याची माहिती भिवंडी गुन्हे शाखेच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे.