"बाळ्यामामा पलटूराम, त्यांची विश्वासार्हता संपलीय"; कपिल पाटलांचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 04:56 PM2024-05-17T16:56:03+5:302024-05-17T16:56:19+5:30
Bhiwandi Loksabha Eelction: भिवंडी लोकसभेची निवडणूक ही गोदामांच्या राजकारणावरुन चांगलीच चर्चेत आलीय. भाजप उमेदवार कपिल पाटील यांनी बाळ्यामामा म्हात्रे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
Bhiwandi Lok Sabha : भिवंडी लोकसभा मतदारसंघात यंदा तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. मुस्लिम, आगरी आणि कुणबी या तीन समाजातील बहुसंख्य मतदार असलेल्या मतदारसंघात शरद पवार गट, भाजप आणि अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांच्यात तगडी लढत होणार आहे. मात्र मतांच्या ध्रुवीकरणाच्या चर्चेमुळे मतदार कुणाकडे वळतात याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सुरेश म्हात्रे यांच्यावर भाजप उमेदवार कपिल पाटील यांनी निशाणा साधला आहे. दुसरीकडे सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांना महाविकास आघाडीतच अंतर्गत विरोधाचा सामना करावा लागतोय.
अशातच भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांनीही बाळ्यामामांवर हल्लाबोल केलाय. बाळ्यामामा यांनी आतापर्यंत सात पक्ष बदलले असल्यामुळे त्यांच्याबाबत कोणतीही विश्वासार्हता राहिलेली नाही. निष्ठेचा अर्थच माहित नसलेल्या बाळ्यामामांना सध्या एकट्यालाच प्रचार करावा लागतोय, अशी टीकाही कपिल पाटील यांनी केली. भिवंडी लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार कपिल पाटील विरुद्ध बाळ्यामामा अशी लढत होत आहे. त्यापूर्वी बाळ्यामामांवर कपिल पाटलांनी जोरदार प्रहार केलाय.
"बाळ्यामामांनी २००९ च्या निवडणुकीत भिवंडी पश्चिम मतदारसंघात कट्टर शिवसैनिकाला डावलून तिकीट मिळवलं खरं, पण त्यांचा दारूण पराभव झाला. तर २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत त्यांचं डिपॉझिट जप्त झालं. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ते शिवसेनेत राहून, तर यावेळच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात राहून कॉंग्रेसच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करत होते. त्यामुळे त्यांच्याकडे पक्षश्रेष्ठींकडून कायम संशयाने पाहिले जाते," असं म्हणत कपिल पाटील यांनी बाळ्यामामांना पलटूराम असे म्हणत टोला लगावला.
"दोन वेळा शिवबंधन झुगारून बाळ्यामामा यांनी शिवसेना सोडली होती. त्यामुळे या मतदारसंघातल्या शिवसैनिकांचाही या उमेदवारीला विरोध असल्याचं कपिल पाटील म्हणाले. दुसरीकडे २०२४ च्या निवडणुकीत काँग्रेसची जागा पळवल्यामुळे बाळ्यामामांवर काँग्रेसचे स्थानिक नेतेही नाराज आहेत. बाळ्यामामा यांच्याकडून नेते आणि कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता स्वत: निर्णय लादले जातात. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे भिवंडीत मनोमिलन झाले नाही. इतकेच नव्हे तर शरद पवार यांच्या सभेलाही गर्दी झाली नाही," अशी टीका कपिल पाटील यांनी केली.
"बाळ्यामामा यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून त्यांच्याविरोधात शेतकऱ्यांची फसवणूक, धमक्या देण्याबाबत अनेक गुन्हे दाखल होते. त्यांनी गोदामांच्या व्यवहारातही गरीब शेतकऱ्यांची फसवणूक केल्याच्या तक्रारी आहेत. अवघ्या १० वर्षांत त्यांच्यावरील सर्वच्या सर्व गुन्हे रद्द झाल्याचा चमत्कार झाल्यामुळे जनतेत आश्चर्य व्यक्त होत आहे. आतापर्यंतच्या प्रचारात ते स्वत:च्या राजकीय कारकीर्दीत स्वत: केलेले एकही काम जनतेला सांगू शकले नाहीत," असेही कपिल पाटील म्हणाले.