भिवंडी महापालिकेत काँग्रेसने मारली बाजी
By admin | Published: May 27, 2017 02:44 AM2017-05-27T02:44:37+5:302017-05-27T02:44:37+5:30
‘भाजपाचा रथ आम्हीच रोखू शकतो. देशांत काँग्रेसच्या विजयाची सुरुवात भिवंडीतून होईल,’ असे सांगत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलेला
लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : ‘भाजपाचा रथ आम्हीच रोखू शकतो. देशांत काँग्रेसच्या विजयाची सुरुवात भिवंडीतून होईल,’ असे सांगत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलेला विश्वास सार्थ ठरवत, भिवंडीकरांनी काँग्रेसच्या पदरात भरभरून दान टाकल्याचे शुक्रवारच्या निकालातून स्पष्ट झाले. ९० पैकी ४७ जागा जिंकत, काँग्रेसने भिवंडीत एकहाती सत्ता संपादन केली. भाजपाने कोणार्क आघाडीशी समझोता करूनही त्या पक्षाला १९ जागांवर समाधान मानावे लागले.
राष्ट्रवादीला शून्य जागा मिळाल्याने, त्या पक्षाच्या घड्याळाची टिकटिक भिवंडीत बंद झाली, तर अवघ्या दोन जागा पदरात पडल्याने, समाजवादी पक्षाच्या सायकलची हवा गेल्याचे चित्र उभे राहिले. मागील वेळेपेक्षा २ टक्के अधिक मतदान झाल्याने वेगवेगळ््या पक्षांनी विजयाचे भरघोस दावे केलेले असताना, ९० जागांपैकी काँग्रेसला सर्वाधिक ४७ जागा मिळाल्या. भाजपाने गेल्या वेळेपेक्षा दुपटीहून अधिक जागा मिळवत १९ जागांवर मजल मारली. शिवसेनेच्या जागा चारने घटल्याने तो पक्ष १२ जागांवर स्थिरावला. भाजपाशी समझोता करून सत्तेत मोठा वाटा मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या कोणार्क विकास आघाडीच्या जागाही, मागील वेळेपेक्षादोनने घटून त्यांना चार जागांवर समाधान मानावे लागले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने आघाडी केली, पण त्यात राष्ट्रवादीला शून्य आणि समाजवादी पक्षाला फक्त दोन जागांवर यश मिळाले. ऐक्यवादी रिपब्लिकन पक्षाने चार आणि अपक्षांनी दोन जागा जिंकल्या. आतापर्यंतच्या परंपरेला तडा जात मतदार पुन्हा त्रिशंकू कौल देतील आणि अपक्षांची संख्या वाढेल, हे राजकीय पक्षांचे दावेही फोल ठरले. या निवडणुकीत २३ प्रभागातील ९० जागांसाठी ४६० उमेदवार रिंगणात होते. मागील वेळी दोन वॉर्डांचा एक प्रभाग या पद्धतीने, तर या वेळी चार वॉर्डांचा एक प्रभाग या पद्धतीने निवडणूक झाली. दर वेळी निवडणुकीत कारणाने धार्मिक मुद्दे, तेढ उपस्थित करण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु यंदा निवडणूक शांततेत पार पडली, हेही या निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरले.
अल्पसंख्य मतदारांत विश्वास निर्माण करण्यात आलेले यश ही काँग्रेसची बाजू ठरली. त्याच वेळी आधीच्या सत्तेत सहभागी असूनही, फारशी कामे न करणाऱ्या कोणार्क आघाडीसोबत समझोता केल्याचा भाजपाला फटका बसला. पक्षांतर्गत नाराजी उफाळून आली. संघ परिवाराने तर ‘नोटा’चा पर्याय वापरत असल्याचा इशारा दिला. त्यामुळे भाजपाच्या प्रतिमेला धक्का बसला. भिवंडीत मेट्रो आणण्याचे आश्वासन, यंत्रमागधारकांना दिलेल्या सवलती यांचाही फायदा भाजपाला मिळाला नाही.