भिवंडीचा पीयूष सीए परीक्षेत देशातून दुसरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2017 06:36 AM2017-01-18T06:36:17+5:302017-01-18T06:36:46+5:30
सीए अंतिम परीक्षेत ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील पीयूष रमेश लोहिया या विद्यार्थ्याने महाराष्ट्राचा झेंडा फडकावला आहे.
मुंबई : ‘इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाउंटन्ट््स आॅफ इंडिया’ने गेल्या नोव्हेंबरमध्ये घेतलेल्या सीए अंतिम परीक्षेत ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील पीयूष रमेश लोहिया या विद्यार्थ्याने महाराष्ट्राचा झेंडा फडकावला आहे. ७१.७५ टक्के गुण मिळवून पीयूषने संपूर्ण देशात दुसरा क्रमांक मिळविला.
पीयूषने दोन्ही ग्रुपमधील आठही विषयांची परीक्षा एकदम देऊन ८०० पैकी ५७४ गुण मिळविले. लखनऊ येथील इति अगरवाल ७४.८८ टक्के गुण मिळवून (५९९/८००) देशात पहिली तर ७०.७५ टक्के गुण (५६६/८००) गुण मिळविणारी अहमदाबाद येथील ज्योती मुकेशभाई माहेश्वरी देशात तिसरी आली.
देशभरातील ३८२ केंद्रांवर एकूण ७४ हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यापैकी ३६ हजार ७६८ विद्यार्थ्यांनी ग्रुप-१ व ग्रुप-२ अशा दोन्ही ग्रुपची परीक्षा एकदम दिली होती. त्यातील ११.५७ टक्के विद्यार्थी दोन्ही ग्रुपमध्ये उत्तीर्ण झाले. याखेरीज ३७ हजार २०० विद्यार्थ्यांनी फक्त ग्रुप-१मधील विषयांची परीक्षा दिली होती. त्यापैकी फक्त ७.१४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. फक्त ग्रुप-२ ची परीक्षा देणाऱ्या ३६,८९६ विद्यार्थ्यांपैकी १२.३२ टक्के विद्यार्थी यशस्वी ठरले.
सीए अंतिम परीक्षेचा निकाल यंदा गतवर्षीच्या तुलनेत किंचित जास्त लागला आहे. आजच्या या निकालाने देशात ७,१९२ नवे सीए झाले आहेत. (विशेष प्रतिनिधी)
>अत्यानंद झाला : परीक्षेत पहिला क्रमांक मिळाल्याचा अत्यानंद झाला. माझे वडिलही सीए आहेत. निकाल जाहीर झाल्यापासून मोबाईलवरून सारखा अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. माझ्या व्यावसायिक कौशल्याचा पुरेपूर उपयोग होईल व नवनवी आव्हाने समोर येतील अशा पदावर काम करायचे व आयुष्याच्या सर्व क्षेत्रात परिणामकारक ठरायचे, एवढेच माझे साधे-सोपे ध्येय आहे.- इति अगरवाल, प्रथम क्रमांक.
नियोजन महत्त्वाचे!
माझ्या चुलत भावंडांनी ‘सीए’ केले असल्यामुळे मला त्यांच्याकडून प्रेरणा मिळाली. सर्वसाधारणपणे दिवसाला १२ तास अभ्यास करत होतो. आर्टिकलशीप सुरू झाल्यावर जसा वेळ मिळेल त्याप्रमाणे २ ते ३ तास अभ्यास केला.नियोजन करून अभ्यास केल्यास यश नक्कीच मिळते. परीक्षेच्या काळात एका पेपरला दीड दिवस मिळतो. त्यात १० टॉपिक करायचे असतात. म्हणून नियोजन महत्त्वाचे आहे. स्ट्रॅटेजिक फायन्सास मॅनेजमेंट हा माझा आवडता विषय आहे.
- पीयूष लोहिया, दुसरा क्रमांक.
>प्रशासकीय सेवेत काम करायचे : मला प्रशासकीय सेवेत रुजू व्हायचे आहे. तिथे काम करायला आवडेल. म्हणून सध्या त्याची तयारी करत आहे. मी दिवसाला १३ ते १४ तास अभ्यास केला होता. आर्टिकलशीप सुरू असताना जेमतेम २ ते ३ तास अभ्यास करायला मिळायचा. अनेकजण सीएच्या परीक्षेला घाबरतात. खर म्हणजे घाबरायचे कारण नाही. आवड असेल तर अभ्यास होतो आणि यशही मिळते. - ज्योती माहेश्वरी, तिसरा क्रमांक.