भिवंडीत मोदी डाइंगला भीषण आग
By Admin | Published: March 4, 2017 05:40 AM2017-03-04T05:40:33+5:302017-03-04T05:40:33+5:30
अमीना कम्पाउंड या निवासी विभागात असलेल्या मोदी डाइंग या कपड्यावर रंगप्रक्रिया करणाऱ्या कंपनीस शुक्रवारी दुपारी अचानक आग लागली.
वज्रेश्वरी : भिवंडीतील धामणकरनाका अमीना कम्पाउंड या निवासी विभागात असलेल्या मोदी डाइंग या कपड्यावर रंगप्रक्रिया करणाऱ्या कंपनीस शुक्रवारी दुपारी अचानक आग लागली. परंतु, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग विझवण्यासाठी भिवंडीसह कल्याण, ठाणे येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. विशेष म्हणजे या कंपनीस मागील महिन्यात किरकोळ आग लागली होती.
भिवंडीतील अमीना कम्पाउंड येथील नागरी वस्तीत असलेल्या मोदी डाइंगला दुपारी अचानक आग लागली. शुक्र वार असल्याने कंपनी बंद होती. कंपनीबाहेर धुराचे लोट दिसू लागल्यावर या आगीची माहिती समजली. त्यानंतर अग्निशमन दलाला बोलावले. कंपनीच्या जवळच मशीद असल्याने तेथून नमाज सुटल्यावर आग बघण्यासाठी बघ्यांची गर्दी झाली होती. भोईवाडा पोलीस ठाण्याच्या मदतीला भिवंडीतील इतर पोलीस ठाण्याचे कर्मचारी मदतीसाठी आल्यावर गर्दीला पांगवण्यात आले. त्यानंतर आग विझवण्यास सुरुवात झाली.
या डाइंग कंपनीभोवती नागरी वस्ती असल्याने आगीमुळे असंख्य कुटुंबीयांनी आपली घरे बंद करून जवळच्या इमारतीमध्ये आसरा घेतला. सुरक्षेचा उपाय म्हणून या घरांमधील गॅस सिलिंडरसुद्धा बाहेर काढण्यात आले. (वार्ताहर)
>आग लागते की लावली जाते?
या कंपनीला बऱ्याच वेळा आग लागल्याची घटना घडली आहे. मागील महिन्यात रात्रीच्या वेळी आग लागली होती. तर, मागील वर्षी मोठी आग लागली होती. त्यामुळे या कंपनीस आज काम बंद असताना आग लागते की लावली जाते, याबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. मोदी डाइंग कंपनीला लागलेल्या आगीस आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमनदलाला शर्थीचे प्रयत्न करावे लागले.