शिवसेनेकडून बेकायदा भूमिपूजन

By admin | Published: September 18, 2016 04:15 AM2016-09-18T04:15:04+5:302016-09-18T04:15:04+5:30

ठाकुर्ली-माणकोली येथील प्रस्तावित उड्डाणपुलाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी भूमिपूजन होण्याअगोदर शनिवारीच डोंबिवलीत शिवसेनेने भूमिपूजन केले

Bhiyaida Bhumi Pujan from Shivsena | शिवसेनेकडून बेकायदा भूमिपूजन

शिवसेनेकडून बेकायदा भूमिपूजन

Next


डोंबिवली : मोठागाव ठाकुर्ली-माणकोली येथील प्रस्तावित उड्डाणपुलाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी भूमिपूजन होण्याअगोदर शनिवारीच डोंबिवलीत शिवसेनेने भूमिपूजन केले. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या इशाऱ्यावरून हे घडल्याची चर्चा असली तरी त्यांनी या कार्यक्रमापासून चार हात दूर राहण्याचा पवित्रा घेतला. त्यामुळे रविवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत होणाऱ्या शासकीय समारंभात या घटनेचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
उड्डाणपुलाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम भिवंडीजवळ ठेवल्याने कल्याण-डोंबिवलीमधील शिवसैनिक नाराज झाले होते. त्यानंतर, डोंबिवली शहर शाखेने भूमिपूजनाचा घाट घातला. मात्र, पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी त्याला दांडी मारली. डोंबिवली व कल्याणच्या शहरप्रमुखांच्या हस्ते या वेळी भूमिपूजन करण्यात आले.
डोंबिवली शहरप्र्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी शुक्रवारी मध्यवर्ती शाखेत बैठक घेऊन हा घाट घातला. त्यासाठी कल्याण व उल्हासनगरातून शिवसैनिक आले होते. तेथे त्यांनी ‘हमसे जो टकरायेगा...’ अशा घोषणा देत भूमिपूजन केले. (प्रतिनिधी)
>एकनाथ शिंदे गैरहजर
रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमाला हजर राहणे क्रमप्राप्त असल्यानेच पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे शिवसेनेच्या अनधिकृत भूमिपूजन सोहळ्यास हजर राहिले नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिंदे भूमिपूजन समारंभावरून शिवसैनिकांमध्ये असलेली खदखद व्यक्त करतात की गप्प बसतात याबाबत शिवसैनिकांमध्ये उत्सुकता आहे. त्याच वेळी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेबाबतही भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे.
>शिवसेनेच्या हातावर भाजपाची तुरी
मुंबई : महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजण्यापूर्वीच शिवसेना व भाजपामध्ये श्रेयाचे राजकरण पेटले आहे. स्वबळावर निवडणूक लढवण्याची शक्यता असल्याने भाजपा नेते पालिकेच्या प्रकल्पांचे परस्पर उद्घाटन करत आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. दहिसर येथील उद्यान, जलतरण तलाव व व्यायामशाळेचे उद्घाटन शनिवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.
मात्र पालिकेचा निधी या प्रकल्पांसाठी खर्च झाला असताना मित्रपक्ष शिवसेनेला डावलून स्थानिक भाजपा नगरसेवक यांनी परस्पर हा कार्यक्रम आयोजित केला. याची खबर उशिरा लागलेल्या शिवसेनेला केवळ हात चोळत बसावे लागले.
नगरसेवकांनी पालिकेच्या प्रकल्पांचे परस्पर उद्घाटन करण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी काँग्रेसच्या नगरसेविका नयना सेठ यांनी माटुंगा येतील प्रकल्पाचे असे उद्घाटन केले होते. मात्र या वेळेस मित्रपक्षांमध्येच श्रेयासाठी रस्सीखेच सुरू आहे.

Web Title: Bhiyaida Bhumi Pujan from Shivsena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.