भोईर यांना महापौरपदाचे गाजर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2017 04:33 AM2017-01-17T04:33:05+5:302017-01-17T04:33:05+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वारंवार होणाऱ्या अपमानाला आणि डावलण्याला कंटाळून भोईर अ‍ॅण्ड कंपनीने दोन वेळा शिवसेनेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला

Bhoir Mayor's carrot! | भोईर यांना महापौरपदाचे गाजर!

भोईर यांना महापौरपदाचे गाजर!

Next

अजित मांडके,

ठाणे- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वारंवार होणाऱ्या अपमानाला आणि डावलण्याला कंटाळून भोईर अ‍ॅण्ड कंपनीने दोनवेळा शिवसेनेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. मागील वर्षी एप्रिल महिन्यात झालेल्या पोटनिवडणुकीनंतरच हा प्रवेश निश्चित मानला जात होता. परंतु, काही तांत्रिक अडचणी आल्याने हा प्रवेश पुढे ढकलला गेला. आता देवराम भोईर यांना शिवसेनेने महापौरपदाचे गाजर दाखवल्यानेच त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचे बोलले जात आहे.
घोडबंदर भागातील बाळकुम, ढोकाळी, कोलशेत, मनोरमानगरया पट्ट्यात सुमारे ३० वर्षे भोईर कंपनीचा बोलबाला आहे. मनपा स्थापन झाली, त्या वेळी देवराम भोईर भाजपाच्या तिकिटावर निवडून आले होते. परंतु, ज्या वेळेस पालिकेत आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली, त्यावेळेस शिवसेनेच्या बाजूने उभे राहण्याऐवजी भोईर यांनी काँग्रेसच्या पंजाला साथ दिली. परंतु, प्रदेशपातळीवर काँग्रेसमध्ये दुफळी माजल्यानंतर शरद पवार यांनी राष्ट्रवादीची पायाभरणी केली. त्यावेळी ठाण्यातील तब्बल ७० टक्के काँग्रेसजनांनी पवारांना साथ दिली. त्यात भोईर कंपनीचादेखील समावेश होता. त्यानंतर, मागील तीन टर्म त्यांचे पुत्र संजय भोईर निवडून येत आहेत. मागील २०१२ च्या निवडणुकीत संजय भोईर यांची पत्नी उषा भोईर यादेखील निवडून आल्या. परंतु, याच निवडणुकीत देवराम भोईरांच्या विरोधात फासेपडले आणि त्यांची सहाव्यांदा पालिकेत जाण्याची संधी हुकली. देवराम यांचे पक्षातील वजन कमी झाले. भोईर यांनी लॉरेन्स डिसोझा यांच्या जातप्रमाणपत्राच्या वैधतेच्या मुद्यावरून न्यायालयात धाव घेतली आणि त्यात त्यांचा विजय झाला. मागील वर्षी एप्रिल महिन्यात त्यांच्या प्रभागात पोटनिवडणूक झाली. या वेळेस देवराम यांनी पक्षाच्या निशाणीवर अर्ज न भरता अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. त्याचवेळेस पक्षातून अन्य काहींनी अर्ज भरला. त्यामुळे ही निवडणूक रंगतदार झाली. ऐनवेळी देवराम यांनी सेनेची मदत घेतली आणि निवडणूक बिनविरोध केली.
या निवडणूक काळातच आता भोईर कंपनीचा शिवसेनेतील प्रवेश निश्चित मानला जात होता. परंतु, संजय भोईर यांच्याकडे लोकशाही आघाडीचे असलेले गटनेतेपद तसेच उच्च व सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकांची सुनावणी या तांत्रिक मुद्यांमुळे त्यांचा दोन वेळा होणारा प्रवेश लांबणीवर पडला. अखेर, सोमवारी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. भोईर कंपनी शिवसेनेत गेल्याने माजिवडा, कोलशेत, बाळकुम, ढोकाळी, घोडबंदर, मानपाडा या भागांमध्ये शिवसेनेला ताकद प्राप्त झाली आहे. भोईर कुटुंबीय सहा जागांवर निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे आता शिवसेनेत आणखी एक घराणेशाही तयार होणार आहे.
२००९ च्या विधानसभा निवडणुकीत देवराम भोईर ठाणे शहर मतदारसंघातून पक्के उमेदवार मानले जात होते. परंतु, आघाडी झाल्याने त्यांचे तिकीट कापण्यात आले. त्यामुळे त्यांनी पक्षाची नाराजी ओढवून घेत अपक्ष आमदारकी लढली. मात्र, त्यांचा पराभव झाला. त्यानंतर, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेसही त्यांना डावलले. शहराध्यक्षपदाचे ते प्रबळ दावेदार मानले जात होते, तर विरोधी पक्षनेतेपदाकरिता दीर्घकाळ प्रतीक्षा केल्यानंतर संजय भोईर यांना ते देण्यात आले. विरोधी पक्षनेतेपद मिळाल्यानंतरही त्यांना पक्षात मानसन्मान नव्हता. विरोधी पक्षनेते असताना त्यांना ‘पक्षविरोधी नेते’ असे उपहासाने संबोधले जात होते.
>शिवसेनेची संजय यांना ‘मोठी’ आॅफर
देवराम भोईर यांना शिवसेनेने महापौरपदाचे गाजर दाखवले असून संजय भोईर यांनादेखील मोठी आॅफर देण्यात आल्याची माहिती आता समोर येत आहे. परंतु, संजय भोईर यांनी याचा इन्कार केला आहे.

Web Title: Bhoir Mayor's carrot!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.