भोईरपाडा जलमय!
By admin | Published: June 28, 2016 03:09 AM2016-06-28T03:09:38+5:302016-06-28T03:09:38+5:30
पावसाच्या तडाख्याने वसईत ठिकठिकाणी पाणी साठल्याने वसई विरार महापालिकेचा नालेसफाईचा दावा फेल ठरला आहे.
वसई : पावसाच्या तडाख्याने वसईत ठिकठिकाणी पाणी साठल्याने वसई विरार महापालिकेचा नालेसफाईचा दावा फेल ठरला आहे. नालासोपारा शहरात आजही पाणी साचून राहिले होते. तर काल गावराईपाड्यातील भोईरपाड्यात गटारातील पाणी घुसल्याने लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
वसई-विरार महापालिकेचा पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे पूर्ण केल्याचा दावा पहिल्याच पावसाने फोल केल्याने पालिका प्रशासन चांगलेच तोंडघशी पडले आहे. नालासोपारा शहरात गेल्या दोन दिवसांपासून अनेक ठिकाणी पाणी तुंबून राहिले आहे. त्यातच आता वसई पूर्वेतील गावराईपाड्यातील भोईरपाड्यात पालिकेच्या सफाई कामाचा पावसाने चांगलाच पंचनामा केला आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या संततधार पावसाने भोईरपाडा जलमय झाला असून लोकांच्या घरात पावसाचे पाणी शिरले आहे. पाण्याबरोबर गटारातील पाणी देखील लोकांच्या घरात व दुकानात घुसल्याने रोगराई पसरण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. वसई पूर्वेतील पालिकेच्या प्रभाग क्र.७२ मध्ये मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत करुन टाकले आहे. भोईरपाड्यातील लोकांच्या घरात एक फुटापर्यंत पाणी साचल्याने त्यांचे संसार खाटेवर घ्यावे लागले आहेत.(वार्ताहर)
>तातडीने उपाय करा स्थानिकांची मागणी
पावसाळी पाण्याबरोबर गटारातील घाण देखील लोकांच्या घरात घुसल्याने सर्वत्र दुर्गंधीचे वातावरण निर्मांण झाले आहे. त्यामुळे प्रभागात रोगराई पसरण्याची भीती स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे. पुढील अठ्ठेचाळीस तासात मुसळधार पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने या प्रभागात तातडीने उपाययोजना करावी अशीही त्यांची मागणी आहे.