भोके रेल्वे स्थानकाला फलाटाची प्रतीक्षा
By Admin | Published: August 28, 2016 01:23 AM2016-08-28T01:23:18+5:302016-08-28T01:39:30+5:30
रत्नागिरी रेल्वे स्थानकाच्या अगोदर येणाऱ्या भोके स्थानकावर रेल्वे प्लॅटफॉर्मच नसल्याने गावकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. वारंवार निवेदन, अर्ज करूनही
- प्रवीण दाभोळकर, मुंबई
रत्नागिरी रेल्वे स्थानकाच्या अगोदर येणाऱ्या भोके स्थानकावर रेल्वे प्लॅटफॉर्मच नसल्याने गावकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. वारंवार निवेदन, अर्ज करूनही कार्यवाही होत नसल्याने गावकऱ्यांनी ऐन गणपतीत रेल रोको करण्याचा इशारा दिला आहे. गेली पंधरा वर्षे लढा देऊनही आश्वासक उत्तर गावकऱ्यांना मिळत नाही.
विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारणारे रेल्वे प्रशासन देशातील अनेक स्थानकांवर सोयी-सुविधा पुरविण्यास अपयशी ठरत असल्याचे दिसत आहे. एकीकडे प्लॅटफॉर्मची उंची वाढण्यासाठी गोंधळ घातला जातो, पण भोके रेल्वे स्थानकासारखी अनेक स्थानके अशी आहेत जिथे स्थानकाला प्लॅटफॉर्मच नाही. भोके रेल्वे स्थानकावर निवळी, भोके, कबुर्डे, हातखंबा, फणसवळे इ. गावांतील चाकरमानी, गावकरी इथून प्रवास करतात.
जमिनीला लागूनच रेल्वे रूळ असल्याने प्रवाशांना जीव धोक्यात घालून चढ-उतार करावा लागत आहे. पावसातून, रात्रीच्या वेळेस गावकऱ्यांना याचा जास्त त्रास होतो.
भोकेपासून २९ कि.मी.च्या उक्षी आणि रत्नागिरी रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म आहे. भोके येथे प्लॅटफॉर्म नसल्याने रूळ ओलांडताना गाई-गुरेही रेल्वेखाली येतात. तक्रार निवारण केंद्र नसल्याने पुढे काहीच कार्यवाही होत नाही. तक्रार केल्यास आपल्यालाच दंड भरावा लागेल या भीतीने गावकरी तक्रार देत नाहीत.
दुर्घटनेआधी सुविधा द्यावी असे गावातील स्थानिक विष्णू रेवाळे यांनी सांगितले. भोके ग्रामपंचायतीतर्फे रेल्वे प्रशासनाला वारंवार निवेदने देण्यात आली आहेत, पण त्यावर काही समाधानकारक उत्तर न आल्याचे गावकरी संतोष आंबेकर सांगतात.
भोके रेल्वे स्थानकाच्या प्रश्नासंदर्भात रेल्वेमंत्र्यांची भेट घेतली. या स्थानकातून मिळणारे उत्पन्न कमी असल्याने ते ‘ई’ गटात मोडते. त्यामुळे येथे विकास होण्यास दिरंगाई होत असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. गावकरी संपर्कात आहेत. प्रश्न मार्गी लागेपर्यंत लढा सुरूच राहील.
- हुसेन दलवाई, राज्यसभा खासदार
गेली पंधरा वर्षे हा लढा सुरू आहे. पण गावकऱ्यांना दाद मिळत नाही. त्यामुळे ऐन गणपतीत गावकरी भोके येथे रेल रोको करणार आहेत. त्यामध्ये आमची जबाबदारी म्हणून कोकण विद्यापीठ संघर्ष समितीही सामील होणार आहे.
- किरण सावंत
अध्यक्ष, कोकण विद्यापीठ संघर्ष समिती
आमचा एक बैल रेल्वेखाली येऊन मृत पावला. रेल्वेतून उतरताना पडल्याने वहिनीला मणक्याचा त्रास सुरू झाला. तिच्या मणक्याचे आॅपरेशन करावे लागले. अनेक गावकऱ्यांना अशा त्रासातून जावे लागल्याने संतप्त वातावरण आहे.
- प्रकाश मायगुडे, श्रीसोमिया विकास संस्था भोके, मुंबई, संस्थापक, कार्याध्यक्ष