भोंदूबाबा मंत्र्यांना झाडावर चढवितात - सुशीलकुमार शिंदे
By admin | Published: July 29, 2016 04:21 PM2016-07-29T16:21:24+5:302016-07-29T16:21:24+5:30
भोंदूबाबांचा मंत्र्यांकडे राबता असतो. ते नेहमीच मंत्र्यांना हरभऱ्याच्या झाडावर चढवित असतात. मलाही एकदा बाळसाहेब ठाकरे यांनी एका बाबाकडे नेले होते.
ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. २९ : भोंदूबाबांचा मंत्र्यांकडे राबता असतो. ते नेहमीच मंत्र्यांना हरभऱ्याच्या झाडावर चढवित असतात. मलाही एकदा बाळसाहेब ठाकरे यांनी एका बाबाकडे नेले होते. त्या भोंदूबाबाने माझ्या कपाळाला हात लावला अन् मला शॉक बसला. या बाबाच्या भोंदूगिरीबद्दल मला संशय आलाच होता आणि कालांतराने तो महाराष्ट्र पोलिसांच्या जाळ्यातही सापडला... माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे येथील एका कार्यक्रमात म्हणाले.
अंधश्रध्दा निमूर्लन समितीचे कार्यकर्ते शहाजी भोसले यांना शिंदे यांच्या हस्ते डॉ. निर्मलकुमार फडकुले समाज सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. शिंदे म्हणाले, मंत्रीपदाच्या काळात माझ्याकडे अनेक बुवा यायचे अन् हरभऱ्याच्या झाडावर चढवायचे. कधी कधी कावळा बसायला आणि फांदी तुटायला गाठ पडायची. त्यांचं सांगणं खरं व्हायचं. १९८० साली मी दुसऱ्या पक्षातून काँग्रेस आयमध्ये आलो. बॅ. ए. आर. अंतुले त्यावेळी मुख्यमंत्री झालो.
मी दुसऱ्या पक्षातून आल्यामुळे मला मंत्रीपद मिळायची शक्यता वाटत नव्हती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे माझे जीवलग मित्र. ते म्हणायचे, तुम्ही मुख्यमंत्री व्हायच्या लायकीचे आहात; पण कुठे अडथळा येतो, पाहुयात, असे सांगून ते मला एका बाबाकडे घेऊन गेले. त्या बाबाने माझ्या कपाळाला हात लावल्यावर मला शॉक बसला; पण त्याच्याबद्दल शंका आली.
बाळासाहेबांना मी तसे म्हणालोही. बाळासाहेबांनी मग त्याला शिवसेना भवनात बोलाविले. तिथेही त्याने चमत्कार करून दाखविले; पण तरीही मला तो भोंदू वाटत होता. पुढे या बाबाला अटक झाली....शिंदे सांगत होते.