पुणे मेट्रोचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2016 08:37 PM2016-12-24T20:37:53+5:302016-12-24T21:43:44+5:30

बेनामी संपत्तीचे विधेयक संसदेने १९८८ मध्येच मंजूर केले होते. मात्र, मागील सरकारांनी ते अडवून ठेवले. कायदा लागूच केला नाही.

Bhoomipujan concludes with the blessings of Prime Minister Modi of Pune Metro | पुणे मेट्रोचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

पुणे मेट्रोचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

Next

 ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 24 - बेनामी संपत्तीचे विधेयक संसदेने १९८८ मध्येच मंजूर केले होते. मात्र, मागील सरकारांनी ते अडवून ठेवले. कायदा लागूच केला नाही. त्यामुळे बेनामी संपत्तीचे पाप वाढत गेले. या पापांना रोखण्यासाठीच कठोर पावले उचलली आहेत. गेल्या ४० वर्षांत देशातील रोगांवर वेळीच इलाज झाला असता तर १२५ कोटी जनतेला आज रांगेत उभे राहावे लागले नसते, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केला. 
 
पुण्याच्या बहुचर्चित मेट्रोचे भूमिपूजन पंतप्रधांनाच्या हस्ते झाले.यावेळी ते बोलत होते़  व्यासपीठावर राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू,  केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, पालकमंत्री गिरीश बापट, समाज कल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे,  खासदार अनिल शिरोळे, श्रीरंग बारणे, शिवाजीराव पाटील, सुप्रिया सुळे,  पुण्याचे महापौर प्रशांत जगताप, पिंपरी चिंचवडच्या महापौर शकुंतला धराडे  उपस्थित होते़ 
 
मोदी म्हणाले, ‘‘देशाला बरबाद करणाºयांना रोखण्यासाठीच नोटाबंदीचा निर्णय घेतला आहे. ५० दिवस त्रास होणार आहे, हे मी पूर्वीच सांगितले होते.  ५० दिवसांनंतर इमानदारांचा त्रास कमी होईल, मात्र बेईमानांना त्रास वाढत जाईल. त्याचे प्रत्यंतर आताच मोठमोठे बाबू, बॅँकातील अधिकाºयांना घरी जावे लागत आहे. काही तुरुंगात जावे लागत आहे, यातून दिसत आहे. ज्यांनी बॅँकेत पैसे टाकून काळ्याचे पांढरे केले त्यांनी खुश होण्याचे कारण नाही. कारण त्यांचा पैसा नाही तर चेहरा काळा झाला आहे. येत्या दोन-तीन महिन्यांत त्यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लागणार आहे. पूर्वी पैसे नव्हते, आता कोठून आले हे विचारले जाणार आहे.  या बेईमानांनी आता तरी सांभाळावे. अजूनही संधी आहे. चांगल्या रस्त्यावर या. गरीबांच्या हक्काचे पैसे त्यांना परत द्या. नाहीतर वाचण्याची संधी मिळणार नाही. आयुष्यभर त्यांना सुखाची झोप मिळू नये यासाठी मीसुध्दा झोपणार नाही.’’
 
देशातील पूर्वीच्या सरकारांनी काय करून ठेवले आहे माझ्या देशाचे असा सवाल करून मोदी म्हणाले, ‘‘देशातील मुठभर शक्ती सामान्यांना वेठीस धरत होत्या. मात्र, आता १२५ कोटी जनतेचा हुंकार हे मुठभर दाबून टाकू शकणार नाहीत. भ्रष्टाचार, काळा पैसा, दहशतवाद, नक्षलवाद यांविरुध्द लढाई छेडली आहे. नोटाबंदीच्या निर्णयामुळे सामान्यांना जितक्या वेदना झाल्या, तितक्याच मला झाल्या. मात्र, त्यामुळे  अनेक चांगले बदल झाले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० ते ६० टक्के करसंकलन होत नव्हते. ते २०० ते ३०० टक्के झाले. काळा पैसा मोदी घेऊन जातील, त्यापेक्षा इकडे भरून टाका असे त्यांनी केले. ज्यांचे वरपर्यंत हात आहेत, त्यांना नियम तोडण्याची सवय होती. त्या सर्वांना एका रांगेत आणून नियमाचे पालन करायला लावले. ’’
 
मागच्या सरकारांनी खूप कामे माझ्यासाठी बाकी ठेवल्याने चांगली कामे करण्याची संधी मला मिळाली असल्याचे सांगुन मोदी म्हणाले, ‘‘ तत्कालिक राजकीय फायद्याचा विचार न करता भविष्यवेधी विचार करून समस्यांवर उत्तर शोधण्यात येईल. देशात सर्वत्र वेगाने शहरीकरण होत असून त्यासाठी दोन पातळ्यांवर उपाययोजनांची तयारी आमच्या सरकारने केली आहे.  शहराकडील ही धाव कमी करण्यासाठी गावांमध्येच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच जीवनमानाचा दर्जा सुधारला जाईल. १८ व्या शतकात त्यांना जगावे लागणार नाही. आत्मा गावाचा आणि सुविधा शहरांच्या असे वातावरण निर्माण केले जाईल.   केंद्र सरकारने असा विचार करुन त्यासाठी अर्बन मिशन ही योजना आखली आहे़ त्यात मोठ्या शहरांच्या ३५ किलोमीटर परिक्षेत्रात येणारी गावे निवडून त्याचा अर्बन मिशनमध्ये समावेश करण्यात आला आहे़ ’’
 
आपल्याकडे पायाभूत सुविधा उभारण्यात नेहमीच उदासिनता राहिली असल्याची खंत व्यक्त करताना मोदी म्हणाले, ‘‘ रस्तारुंदीकरण करेपर्यंत त्याठिकाणी अतिक्रमणे वाढतात. न्यायालयापर्यंत प्रकरणे जाऊन  २५ -३० वर्षे  कामे रखडतात. जलवाहिन्या टाकेपर्यंत लोकसंख्या वाढून त्या अपुºया पडतात. यासाठी पुढच्या २५ ते ३० वर्षांचा विचार करून विकासकामे केली जातील.’’
 
हायवे आणि आयवे
देशभरातील अडीच लाख पंचायती ऑप्टिकल फायबरने जोडण्याचे काम सुरु केले आहे़ डिजिटल इंडियामध्ये संपूर्ण देशाला जोडण्याचे काम आहे़ एक काळ असा होता की, लोकांना पायाभूत सुविधामध्ये पाणी, रोड, रेल्वे, विमानतळ यांचा समावेश होता़ आता हायवे पाहिजे, त्याबरोबर आयवेही (ऑप्टिकल फायबर)पाहिजे आहे़ 
 
डबल इंजिनची ताकद
गेल्या १५ वर्षात महाराष्ट्राची गाडी खड्ड्यात फसली आहे़ तिला बाहेर काढण्यासाठी डबल इंजिनची ताकद पाहिजे़, असे मी विधानसभा निवडणुकीच्या वेळीच सांगितले होते. केंद्र आणि राज्य सरकार अशी डबल इंजिनची ताकद राज्यातील जनतेने  दिल्याबद्दल नरेंद्र मोदी यांनी सर्वांचे आभार मानले़ 
 
शरद पवारांना भाषणाची संधी नाहीच
पुणे मेट्राच्या भूमिपूजन समारंभात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना व्यासपीठावर स्थान मिळावे यासाठी महापौर प्रशांत जगताप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने जंगजंग पछाडले़ त्यासाठी काँग्रेसला बरोबर घेऊन महापालिकेत पवार यांच्या हस्ते भूमीपूजनाचा ठरावही संमत करुन घेतला़ शेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिष्टाईनंतर शरद पवार यांना व्यासपीठावर स्थान देण्यात आले़ मात्र, त्यांना बोलण्याची संधी देण्यात आली नाही. उलट पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी गेल्या १५ वर्षांतील सरकारांचे पवारांसमोर वाभाडे काढले. पाप वाढू दिल्याचा आरोप केला. 
 
मेट्रो- देर आए,दुरुस्त आए
पुणे मेट्रोला झालेल्या विलंबाबाबत लोक नाराज असणे स्वाभाविक आहे़ ही मेट्रो अगोदरच झाली असतील तर खर्च कमी लागला असता़ अनेकांना मोटारी खरेदी करण्याची वेळ आली नसती. नसती़ पण, देर आये दुरुस्त आये़ यापूर्वीच्या सरकारने अनेक कामे माझ्यासाठी बाकी ठेवली आहेत़ त्यांच्यामुळे मला चांगली कामे करण्याची संधी मिळाली़, असे पंतप्रधानांनी सांगितले. 
 
पुणे हे विशेष शहर
पुणे हे एक विशेष शहर असल्याचे सांगून मोदी म्हणाले, औद्योगिकीकरणात हे शहर पुढे आहे़  शिक्षणाचा हे केंद्र आहे़ एक काळ असा होता की काशीमध्ये जसे विदवान होते, तसेच पुण्यातही विद्वान होतो़ अशा या पुण्याने आॅनलाईन पेमेंट च्या क्षेत्रात चांगले काम करावे, असे आवाहन पंतप्रधानांनी केले.

Web Title: Bhoomipujan concludes with the blessings of Prime Minister Modi of Pune Metro

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.