डोंबिवलीत घरपोच मिळणार भाजी

By admin | Published: February 27, 2017 04:09 AM2017-02-27T04:09:00+5:302017-02-27T04:09:00+5:30

शेतकऱ्यांनी पिकवलेला ताजा भाजीपाला बाजारभावापेक्षा कमी दरात आणि तेही थेट घरपोच डोंबिवलीकरांना उपलब्ध होणार आहे.

Bhopal to get Dombivli Home | डोंबिवलीत घरपोच मिळणार भाजी

डोंबिवलीत घरपोच मिळणार भाजी

Next

जान्हवी मोर्ये,
डोंबिवली- ठाणे जिल्ह्यातील बदलापूर आणि शहापूर येथील शेतकऱ्यांनी पिकवलेला ताजा भाजीपाला बाजारभावापेक्षा कमी दरात आणि तेही थेट घरपोच डोंबिवलीकरांना उपलब्ध होणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपद्वारे भाजीची नोंदणी नोंदवता येणार आहे. त्याचा सर्वाधिक फायदा नोकरदार महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना होणार आहे.
पूर्वेतील पंचायत विहीर परिसरात राहणाऱ्या सुधीर गोगटे यांनी हा उपक्रम सुरू केला आहे. गोगटे यांनी गणेशोत्सवापासून दादर आणि माहीम परिसरात ‘स्वस्त दरात भाजीपाला’ हा उपक्रम सुरू केला. त्यासाठी त्यांनी काही राजकीय पक्षांचा आधार घेतला. परंतु, त्यांच्याकडून या उपक्रमात सातत्य दिसत नसल्याने त्यांनी स्वत:च ‘शेतकरी तुमच्या दारी’ या धर्तीवर हा उपक्रम डोंबिवलीत सुरू करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
नोकरदार महिला घरची कामे उरकून कामाला जातात. घरी परतल्यानंतर स्वयंपाक, पाल्यांचा अभ्यास तसेच घरगुती कामे असतात. तसेच काही वयोवृद्ध मंडळींना बाजारात जाऊन भाजी खरेदी करणे शक्य होत नाही. त्याचबरोबर प्रत्येकाच्या घरी भाजी काय करायची, हा प्रश्न असतोच. या मंडळींना त्यांच्या मागणीप्रमाणे पाव-अर्धा किलोपासून आणि त्यांच्या आवडीनिवडीनुसार घरपोच भाजी दिल्यास त्याला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी कल्पना त्यांच्या मनात आली. त्यामुळे त्यांनी हा व्यवसाय सुरू केला. त्यासाठी त्यांनी व्हॉट्सअ‍ॅपचा आधार घेतला. विविध ग्रुप्सवर त्यांनी भाज्यांचा तपशील आणि दर देणे सुरू केले. सध्या त्यांच्याकडे दिवसाला ३५ पेक्षा जास्त ग्राहक भाजीसाठी नोंदणी करत आहेत. घरपोच भाजी देण्यासाठी ते कोणताही जास्त दर घेत नाहीत. याउलट त्यांच्याकडे भाज्या बाजारभावापेक्षा किमान दोन ते तीन रुपये स्वस्तच मिळत आहेत. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासाच मिळत आहे.
बदलापूर, शहापूर या भागातील हंगामी स्वरूपात नगदी शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडून गोगटे फळभाज्या खरेदी करतात. या भाज्या दोन ते तीन दिवस चांगल्या टिकतात. पालेभाज्या एका दिवसात कोमेजून जातात. त्या टिकवण्यासाठी शीतगृह नसल्याने फळबाज्याच आणत असल्याचे गोगटे म्हणाले. रात्रीत माल खरेदी करून तो दुसऱ्या दिवशी लगेच विकण्यात गोगटे यांचा प्रयत्न असतो. त्यामुळे ग्राहकाला शेतीतील ताजी भाजी मिळते. शेतमाल विकणाऱ्या शेतकऱ्यांशी त्यांचे गणित जुळले आहे. काही शेतकरी गोगटे यांच्या उपक्रमाला चांगला प्रतिसाद देत आहेत. गोगटे यांच्या मागणीनुसार माल बाजारसमितीत पोहोचवला जातो. त्यानंतर गोगटे तेथून तो उलचून ग्राहकांपर्यंत पोहचवतात. त्यासाठी ते टोम्पो, त्यांचे कुटुंबीय आणि प्रशांत नेमाडे यांचा आधार घेतात. आठवड्यातून एक किंवा दोन दिवसाआड ते ३० ते ४० किलो माल आणतात. भविष्यात भाज्या निवडून, साफ करून देण्याचाही त्यांचा मानस आहे. तेसच अन्य ठिकाणीही स्वस्त भाजीपाला विक्रीची त्यांना शाखा सुरू करायची इच्छा आहे.

Web Title: Bhopal to get Dombivli Home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.