भोर तालुका : वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा
By admin | Published: May 6, 2017 02:07 AM2017-05-06T02:07:28+5:302017-05-06T02:07:28+5:30
शहर व परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यासह सुमारे २ तास झालेल्या पावसामुळे ठिकठिकाणी झाडे मोडून पडल्याने विजेच्या तारा तुटल्या
लोकमत न्यूज नेटवर्क
भोर : शहर व परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यासह सुमारे २ तास झालेल्या पावसामुळे ठिकठिकाणी झाडे मोडून पडल्याने विजेच्या तारा तुटल्या असून खांब वाकले आहेत. यामुळे शहरासह ग्रामीण भागातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. तर गारांच्या पावसामुळे आंबा पिकाचे व वीटभट्ट्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले शहरात सर्वत्र पाण्याची तळी साचली आहेत.
मागील दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या उकाड्यामुळे भोर शहर व परिसरात विजेचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह गारांचा सायंकाळी ५ वाजता पावसाला सुरुवात झाली सुमारे २ तास पाऊस झाला. यामुळे तापलेल्या वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. मात्र सदरच्या पावसामुळे भोर शहरातील रामबाग येथील ग्रामीण रुग्णालयासमोरची दोन झाडे तर पंचायत समितीच्या इमारतीजवळचे एक झाड मोडून पडले विजेच्या तारेवरच पडले आहे.
वादळी वाऱ्यासह व विजेच्या कडकडाटासह झालेल्या गारांच्या पावसामुळे शहरासह ग्रामीण भागात झाडे विजेच्या तारेवर पडल्याने तारा तुटल्या असून खांब वाकले आहेत. यामुळे संपूर्ण तालुक्याचा वीजपुरवठा खंडित झाला असल्याने तालुका अंधारात आहे.
अवकाळी गारांच्या पावसामुळे झाडावरचा आंबा खराब झाला आहे. तर गवत, पेंढा व जळणाची लाकडे भिजली आहेत. अचानक झालेल्या पावसामुळे वीटभट्ट्यांवरील वीट भिजल्याने मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाने चांगलाच फटका दिला आहे.
अचानक झालेल्या पावसामुळे वीटभट्ट्यांवरील वीट भिजल्याने मोठे नुकसान झाले आहे. २०१५ साली पावसाळ्यानंतर प्रत्येक महिन्यात वळवाचे पाऊस झाले होते.
इंदापूरलाही पावसाची हजेरी
लासुर्णे : इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील बेलवाडी, लासुर्णे, कळंब आदी भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. शुक्रवारी सकाळपासूनच वातावरणात कमालीची उष्णता होती. सायंकाळी ६ वाजता आकाशात काळे ढग जमा झाले. दोन तास पावसाचे वातवरण झाले होते. अखेर ९:३0 ला पावसाला सुरूवात झाली. वादळी वाऱ्यासह तालुक्याच्या पश्चिम भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसाने जनावरांच्या ओल्या चाऱ्याचा प्रश्न मिटणार आहे. परंतु फळबागांना मात्र तडाखा बसला आहे.
नसरापूरला अर्धा तास बरसला
नसरापूर : सायंकाळी सहाच्या सुमारास नसरापूर आणि परिसरात वाऱ्यासह जवळपास अर्धा तास अवकाळी पाऊस झाला. तर काही ठिकाणी तुरळक पाऊस होऊन शेतकऱ्यांचा कांदा भिजल्याने नुकसान झाले. नसरापूर व परिसरात पाऊस सुरू झाल्याने बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांनी दुकानाच्या आडोशाला उभे राहणे पसंत केले. मात्र, बालगोपालांनी पहिल्यावहिल्या पावसात भिजून आनंद घेतला. पाऊस सुरू झाल्याने येथील काही शेतकऱ्यांचा शेतात काढून ठेवलेला कांदा भिजून नुकसान झाले. तसेच नसरापूरलगतच्या गावांमध्ये कमी अधिक वाऱ्यासह तुरळक पाऊस झाला.
वीज कोसळून कांदाचाळ खाक
ओझर : शिरोली बुद्रुक येथे शुक्रवारी सायंकाळी ७.३० च्या सुमारास येथील सहकारनगर सोसायटीच्या जवळ दोन ठिकाणी वीज कोसळली. पहिली वीज ही शिवाजी थोरवे यांच्या घरातील नारळाच्या झाडावर कोसळली. यात संपूर्ण नारळाचे झाड जळाले. तर काही अंतराच्या वेळातच ७०० मीटर अंतरावर दुधाऱ्या डोंगराजवळील शेतकरी अंकुश रामभाऊ थोरवे यांच्या कांदा चाळीवर वीज पडल्याने कांदा चाळ पूर्णपणे भस्मसात झाली. या घटनेत दोघे जखमी झाले.
शिरोलीला संध्याकाळी ७ च्या सुमारास वेगाने वारे वाहू लागले. यानंतर वीजा कडाडू लागल्या. ७.३० च्या दरम्यान पहिली वीज शिवाजी थोरवे यांच्या घरातील नारळाच्या झाडावर कोसळली. ही वीज कोसळल्याच्या थोड्या अंतरावर अंकुश थोरवे यांच्या शेतातील कांदाचाळीवर वीज कोसळली. यामुळे कांदा चाळ पूर्णपणे जळाली. ही आग विझावताना त्यांचे मुलगा सचिन व गणेश थोरवे हे जखमी झाले. त्यांच्यावर जुन्नर येथील डॉ. मोकाशी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.