मंदिर समिती अध्यक्षपदी भोसले
By admin | Published: July 3, 2017 05:07 AM2017-07-03T05:07:56+5:302017-07-03T05:07:56+5:30
राज्यातील समस्त वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिराचा कारभार पाहणाऱ्या श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिर समितीच्या अध्यक्षपदी कराडचे
यदु जोशी/ लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यातील समस्त वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिराचा कारभार पाहणाऱ्या श्री विठ्ठल रुख्मिणी
मंदिर समितीच्या अध्यक्षपदी कराडचे भाजपा नेते अतुल भोसले यांची नियुक्ती राज्य शासनाने केली आहे. या मंदिर समितीचे प्रशासन चार वर्षांपासून जिल्हा प्रशासनाच्या हाती आहे. जिल्हाधिकारी हे समितीचे सभापती आहेत. समितीचे अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्ती ३० जूनच्या आत करावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने एका याचिकेसंदर्भात दिले होते. त्यामुळे समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड होणार या बाबत प्रचंड उत्सुकता होती.
एमआयटीचे डॉ.विश्वनाथ कराड, अतुल भोसले, भाजपाचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी, श्री गहनीनाथ औसेकर महाराज आदी नावे अध्यक्षपदासाठी चर्चेत होती. तथापि, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतुल भोसले यांच्या नावाला पसंती दिली आहे. पक्षाला विश्वासात घेऊन त्यांनी हा निर्णय घेतला गेला.
भोसले हे भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आहेत. त्यांचे आजोबा जयवंतराव भोसले हे काँग्रेसचे दिग्गज नेते आणि कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक होते. अतुल यांचे वडील डॉ.सुरेश भोसले हे कृष्णा कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष आहेत. स्वत: अतुल भोसले हे कराडच्या कृष्णा मेडकिल कॉलेजचे संचालक आहेत.
राज्य शासनाने शिर्डी संस्थानच्या अध्यक्षपदी भाजपाचे नेते सुरेश हावरे यांची नियुक्ती केली होती. त्यानंतर भोसले यांच्या रुपाने दुसऱ्या भाजपा नेत्याच्या हातात पंढरपूरच्या समितीचा कारभार देण्यात आला आहे.
सिद्धी विनायक ट्रस्टचे अध्यक्षपद कोणाला?
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नरेंद्र राणे हे भाजपाची सत्ता येऊन पावणेतीन वर्षे झाली तरी मुंबईतील श्री सिद्धी विनायक ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. भाजपा सरकारने नवीन समितीच नेमली नाही. राणे यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ २५ जुलैला संपत आहे. युतीमध्ये ठरल्यानुसार या ट्रस्टचे अध्यक्षपद शिवसेनेकडे आहे. त्यामुळे शिवसेनेकडून कोणाच्या नावाला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पसंती देतात या बाबत उत्सुकता आहे.