भुशी धरण ओव्हर फ्लो, पर्यटकांना पाय-यांवर जाण्यास मज्जाव
By Admin | Published: July 15, 2017 12:27 PM2017-07-15T12:27:59+5:302017-07-15T12:34:16+5:30
पर्यटक पंढरी अशी ओळख असलेल्या भुशी धरणाच्या सांडव्यावरून पायऱ्यांवर वेगाने पाणी वाहू लागले आहे. यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांना पाय-यांवर जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे
>ऑनलाइन लोकमत
लोणावळा, दि. 15 - लोणावळा परिसरात झालेल्या दमदार पावसाने पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेले लोणावळ्यातील भुशी धरण ‘ओव्हर फ्लो’ झाले आहे. पर्यटक पंढरी अशी ओळख असलेल्या भुशी धरणाच्या सांडव्यावरून पायऱ्यांवर वेगाने पाणी वाहू लागले आहे. यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांना पाय-यांवर जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. लोणावळी परिसरात दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे.
दोन दिवसांत लोणावळ्यात 312 मिमी पाऊस झाला असल्याने ओव्हर फ्लो झालेल्या भुशी धरणाच्या पायर्यांवरुन मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले आहे. पाण्याला वेगदेखील जास्त असल्याने पायर्यांवर उभे राहणे धोकादायक असल्याने पोलीस प्रशासनाने धरणाच्या पायर्यांवर पर्यटकांना जाण्यास मज्जाव केले आहे.
दरम्यान, भुशी धरण, लायन्स पॉईंट, सहारा पूल धबधबा परिसरात होणारी वाहतुक कोंडी व नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी दर शनिवार व रविवार तसेच सुट्टीच्या दिवशी दुपारी तीन नंतर भुशी धरणाकडे जाणार्या वाहनांना प्रवेश बंदी केली आहे. तसेच वलवण व खंडाळा येथील एन्ट्री पॉईंटपासून अवजड वाहनांना सकाळी 6 ते रात्री 12 वाजण्याच्यादरम्यान लोणावळा शहरात प्रवेश बंदी करण्यात आली असल्याची माहिती लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर शिवथरे यांनी दिली.
शिवथरे म्हणाले शनिवार व रविवार तसेच इतर सुट्टयांच्या काळात होणारी वाहतूक कोंडी व पर्यटकांची गर्दी टाळण्यासाठी काही पर्यायी मार्ग, वाहनतळे तयार करण्यात आली आहे. वलवण ते खंडाळा व कुमार चौक ते भुशी धरणापर्यतचा मार्ग सीसीटीव्हीच्या कक्षेत आणला आहे. पर्यटकांच्या सुरक्षेकरता बंदोबस्ताकरिता 47 पोलीस अधिकारी, 231 पोलीस कर्मचारी, 63 महिला पोलीस, एक स्ट्रायकिंग फोर्सची मागणी करण्यात आली आहे.
तर दुसरीकडे, माळशेज घाटात कोणत्याही क्षणी दरड कोसळण्याची भीती वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पोलिसांनी पर्यटकांना माळशेज घाटात न जाण्याचं आवाहन केले आहे. यामुळे पर्यटकांसाठी माळशेज घाट दोन दिवसांसाठी बंद राहणार आहे. शनिवारी व रविवारी घाटात सहलीसाठी जाण्यास बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक धनंजय पोरे यांनी दिली आहे.
सध्या परिसरात दरडींचा अंदाज घेणे सुरू आहे. दरम्यान वाहतुकीवर अद्याप बंदी घालण्यात आलेली नाही. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून माळशेज घाटात सतत दरडी कोसळण्याचा धोका जाणवत असल्यानं पावसाळ्यात कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी प्रशासनाकडून काळजी घेण्यात येते