भुजबळांनी कंत्राटदारांकडून स्विकारले पैसे

By admin | Published: February 3, 2016 03:45 AM2016-02-03T03:45:38+5:302016-02-03T03:45:38+5:30

छगन भुजबळ सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना ज्या कंपन्यांना सरकारी कंत्राटे मिळाली, त्यांच्याकडून भुजबळांनी रोख पैसे स्विकारले व ही रक्कम त्यांनी आपल्या कंपन्यांमध्ये ठेवली.

Bhujbal accepted the money from the contractors | भुजबळांनी कंत्राटदारांकडून स्विकारले पैसे

भुजबळांनी कंत्राटदारांकडून स्विकारले पैसे

Next

डिप्पी वांकाणी,  मुंबई
छगन भुजबळ सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना ज्या कंपन्यांना सरकारी कंत्राटे मिळाली, त्यांच्याकडून भुजबळांनी रोख पैसे स्विकारले व ही रक्कम त्यांनी आपल्या कंपन्यांमध्ये ठेवली. ही रक्कम ठेवताना त्यांच्या कंपन्यांचे भाग (शेअर्स) अवास्तव वाटतील अशा उच्च भावाने (हाय प्रिमियम) विकले गेल्याचे दाखविले. हे भाग विकताना बनावट गुंतवणूक कंपन्यांचा वापर करण्यात आला होता, असे ईडीने आपल्या रिमांड अर्जात म्हटले आहे.
छगन भुजबळ, समीर भुजबळ आणि पंकज भुजबळचा समावेश असलेल्या आर्थिक गैरव्यवहारांमध्ये राज्याचे अंदाजे ८७० कोटी रुपयांचे नुकसान झाले, असे सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मंगळवारी सायंकाळी न्यायालयाला सांगितले. आम्ही आतापर्यंत ११४ कोटी रुपयांची त्यांची मालमत्ता ओळखून जप्त करू शकलो. आणखी ७५० कोटी रुपयांची मालमत्ता शोधायची आहे, असे ईडीने म्हटले. समीर भुजबळ याची कोठडी मागताना ईडीने समीर हाच हवाला व्यवहारातील मुख्य सहभागी व्यक्ती आहे, असे न्यायालयात सांगितले.
सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांनी समीरने ११ सप्टेंबर, १९ नोव्हेंबर आणि १७ डिसेंबर २०१५ रोजीच्या तिन्ही समन्सकडे दुर्लक्ष केले; त्यामुळे त्याला कोठडी मिळणे आवश्यक असल्याचा युक्तिवाद केला. तर समीरचे वकील प्रवीण बधेका यांनी ईडीकडून समन्स मिळताच भुजबळ यांचे म्हणणे नोंदवून घेण्यासाठी तयार असल्याचे ईडीला लेखी कळविले होते, असे सांगितले.
समीर यांनी त्याचा सीए सुनील नाईक याच्यावर ठपका ठेवला. नाईक याने समीरच्या कंपनीचे भाग ज्या कंपन्या गुंतवणूक करीत आहेत त्या अस्सल होत्या असे सांगून हाय प्रिमियमला विकले, असे समीरचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे कोणत्याही गुंतवणूकदाराला लाभांश (डिव्हिडंड) अदा करण्यात आलेला नाही. समीरने चौकशीत इंडोनेशियामध्ये कोळसा खाण विकत घेण्यासाठी २५ कोटी रुपये गुंतविल्याचे सांगितले.
ईडीने आपल्या रिमांड अर्जात असेही म्हटले आहे की संजय जोशी, तनवीर शेख, गीता जोशी, निमेश बेंद्रे आणि राजेश धारप हे भुजबळांचे कर्मचारी भुजबळांनी स्थापन केलेल्या वेगवेगळ््या कंपन्यांचे कागदोपत्री संचालक बनविण्यात आले होते. या कर्मचाऱ्यांनी ईडीला सांगितले की समीर भुजबळ हा मुख्य व्यक्ती होता व तोच आर्थिक व्यवहार बघायचा. प्रवीण बधेका यांनी आपल्या युक्तिवादात न्यायालयाला सांगितले की सार्वजनिक बांधकाम विभागाने महाराष्ट्र सदन गैरव्यवहारात कोणत्याही चुकीच्या गोष्टी नाहीत, असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला जानेवारी महिन्यात लेखी कळविले होते.
सुनील नाईक हा भुजबळांचा सीए असून त्याने आर्मस्ट्राँग एनर्जी आणि परवेश कन्स्ट्रक्शन्सचे भाग प्रत्येकी ९९० रुपये अशा हाय प्रिमियमला संशयास्पद संस्थांना विकले. यातून ५० कोटी रुपये उभारले गेले.
सुरेश जाजोदिया याला सुनील नाईकने मार्केट आॅपरेटर असे नाव दिले असून त्याने (जाजोदिया) महाराष्ट्र एज्युकेशन ट्रस्टच्या (एमईटी) ब्रांद्रा येथील कार्यालयात पैसे स्विकारल्याचे आणि या बँक खात्यांमध्ये हे पैसे कोलकाता येथील हवाला आॅपरेटरच्या मार्फत ठेवल्याचे मान्य केले.
प्रवीण जैन हा वेगवेगळ््या कंपन्यांचा नियंत्रक (कंट्रोलर) असून त्याने मी सुनील नाईककडून पैसे घेतल्याचे कबूल केले आणि आर्मस्ट्राँग एनर्जीच्या बँक खात्यात १०.५० कोटी रुपये धनादेशाद्वारे भरण्याची व्यवस्था केली, असे कबूल केले.
प्रभाकर सोगम हा जैनचा कर्मचारी असून एमईटीच्या बांद्रा येथील कार्यालयातून अनेकवेळा पैसे गोळा केल्याचे त्याने कबूल केले.
संजीव जैन हा कोलकाता येथील अर्थ सल्लागार असून त्याने सुनील नाईककडून आठ कोटी रुपये मिळाल्याचे आणि आर्मस्ट्राँग एनर्जी आणि परवेश कन्स्ट्रक्शन्सला धनादेशाद्वारे पैसे देण्याची व्यवस्था केल्याचे मान्य केले.
चंद्रशेखर सारडा हा सीए असून त्याने मिनुटेक्स प्रोसेसर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि मंगल सॅगो पी. लिमिटेड या कंपन्या स्थापन केल्याचे आणि या कंपन्यांच्या खात्यात १०.२४ कोटी आणि १५.७८ कोटी रुपयांची व्यवस्था केल्याचे व नंतर ते पैसे परवेश कन्स्ट्रक्शन्सच्या खात्यात ठेवल्याचे मान्य केले.
हिंगोरा फिनव्हेस्ट प्रायव्हेट लिमिटेड ही परवेश कन्स्ट्रक्शन्स्मध्ये सर्वात मोठी भागधारक असून ही कंपनी केवळ कागदोपत्रीच अस्तित्वात आहे.
भुजबळांनी वैयक्तिक पातळीवर/कंपन्यांकडून केवळ १०० रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर (परंतु नोंदणी न केलेल्या) निधी स्विकारला
> भुजबळ समर्थनार्थ राज्यात निदर्शने
नाशिक : महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) माजी खासदार समीर भुजबळ यांना अटक केल्याच्या घटनेचे पडसाद राज्यात ठिकठिकाणी उमटले. नाशिक शहरासह जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कायकर्त्यांनी चक्का जाम आंदोलन केले. या दरम्यान बसची तोडफोड करण्यात आली. रस्त्यावर पेटते टायर्स फेकल्याने काही मार्गांवरची वाहतूकही ठप्प झाली होती.
राज्य सरकार तपासी यंत्रणेवर दबाव आणून हेतुपुरस्सर भुजबळ कुटुंबियांविरुद्ध कारवाई करीत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सकाळी सांगितले. त्यानंतर राष्ट्रवादीसह छगन भुजबळ अध्यक्ष असलेल्या अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर येत निषेध व्यक्त केला.नाशिकातील राष्ट्रवादी भवन येथे दुपारी बाराच्या सुमारास कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले. त्यांनी द्वारका चौकात भाजपा सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी केली़ फडणवीस सरकारचा प्रतीकात्मक पुतळा तयार करून तो जाळण्याचा प्रयत्न केला़ मात्र, पोलिसांनी तो हाणून पाडला़

Web Title: Bhujbal accepted the money from the contractors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.