भुजबळांचा जामीन; उद्या निर्णय

By admin | Published: May 12, 2016 03:28 AM2016-05-12T03:28:38+5:302016-05-12T03:28:38+5:30

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या जामिनाबाबत शुक्रवारी निर्णय होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र सदन गैरव्यवहार प्रकरणात सध्या ते अटकेत आहेत.

Bhujbal bail; Tomorrow's decision | भुजबळांचा जामीन; उद्या निर्णय

भुजबळांचा जामीन; उद्या निर्णय

Next

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या जामिनाबाबत शुक्रवारी निर्णय होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र सदन गैरव्यवहार प्रकरणात सध्या ते अटकेत आहेत. भुजबळ यांनी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत प्रकृतीच्या कारणास्तव जामीन मागितला आहे.
सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) न्यायालयात अन्य ३४ आरोपींच्या अटकेसाठी सहा आठवड्यांचा कालावधी मागितला आहे. यात प्रामुख्याने पंकज भुजबळ, राज्यसभेचे सदस्य संजय काकडे, बिल्डर असिफ बलवा, विनोद गोएंका यांचा समावेश आहे. या सर्वांविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट आहे. यातील बहुतांश आरोपींनी हे वॉरंट रद्द करण्यासाठी अर्ज केलेले आहेत. पण पंकज भुजबळ यांनी यासंदर्भात कोणतेही पाऊल उचललेले नाही.
दरम्यान, समीर भुजबळ यांना जेव्हा न्यायालयात हजर करण्यात आले, त्याचवेळी छगन भुजबळ यांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे हजेरी झाली. या दोघांचीही न्यायालयीन कोठडी २५ मेपर्यंत वाढविण्यात आली आहे. भुजबळांचे वकील प्रसाद ढाकेफळकर यांनी सांगितले, की भुजबळ यांना काही वर्षांपासून जुने आजार आहेत. अस्थमा, मधुमेह, उच्च रक्तदाब आदी आजार त्यांना आहेत. तथापि, या जामिनाला विरोध करताना ईडीच्या वकील पौर्णिमा कंथारिया यांनी सांगितले, की अनेक वर्षांपासून भुजबळ यांना हा त्रास आहे. परंतु या काळात आणि आताही दैनंदिनीत काही समस्या उद्भवली नाही. भुजबळ यांना योग्य त्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे जामिनासाठी हे कारण होऊ शकत नाही, असेही त्या म्हणाल्या.
राज्यसभेचे सदस्य संजय काकडे यांच्या वकिलाने काकडेंवर बजावण्यात आलेले वॉरंट रद्द करण्याची मागणी केली. त्यावरील सुनावणी न्यायालयाने गुरुवारपर्यंत लांबणीवर टाकली.
> छगन भुजबळ यांना असलेले आजार
१९८० पासून श्वासनलिकेसंबंधीचा दमा (अस्थमा). त्यावर १९९९ पासून बाँबे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू. दम्यासाठी ते नेब्युलायझर वापरतात.
१९९० पासून मधुमेह आणि अति रक्तदाब. दिवसातून दोन ते तीन वेळा रक्तातील साखरेची पातळी तपासणे आवश्यक आहे.
२००० पासून श्वास घेताना तो थांबण्याचा त्रास.
२००४ मध्ये हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांच्या अँजिओप्लास्टीचा उपचार ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये झाला.
२०१४ पासून हृदयाचे ठोके हळू होणे व बेशुद्धावस्थेचा त्रास.

Web Title: Bhujbal bail; Tomorrow's decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.