बेधडक वृत्तीने भुजबळ संकटात

By admin | Published: June 9, 2015 02:08 AM2015-06-09T02:08:05+5:302015-06-09T02:08:05+5:30

छगन भुजबळ हे त्यांच्या बेधडक वृत्तीने पुन्हा राजकीय संकटात सापडले आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्यावर आता गुन्हा दाखल केला आहे.

In the Bhujbal crisis with flashy figures | बेधडक वृत्तीने भुजबळ संकटात

बेधडक वृत्तीने भुजबळ संकटात

Next

मुंबई : छगन भुजबळ हे त्यांच्या बेधडक वृत्तीने पुन्हा राजकीय संकटात सापडले आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्यावर आता गुन्हा दाखल केला आहे. याखेरीज मनी लॉड्रिंगसाठी भुजबळांची सक्त वसुली संचालनालय (एन्फोर्समेंट डायरेक्टरेट) मार्फत चौकशी केली जाऊ शकते. यापूर्वी बनावट स्टँम्प घोटाळ््यातील आरोपी अब्दुल करीम तेलगी याला गृहमंत्री असताना मदत केल्याबद्दल भुजबळ यांच्यावर कारवाई होणार होती. मात्र त्या वेळी ते कसेबसे वाचले होते.
भुजबळ यांच्यावर कलिना येथील विद्यापीठाच्या अखत्यारीतील मोठा भूखंड इंडिया बुल्सला दिल्याबद्दल गुन्हे दाखल करण्याचा आदेश एसीबीने दिला आहे. याखेरीज दिल्लीतील महाराष्ट्र सदन व मलबार हिल येथील हायमाउंट गेस्ट हाऊसच्या पुनर्विकासाचे काम कुठलीही निविदा न मागवता मे. चमणकर असोसिएट्स या आपल्या निकटवर्तीय विकासकाला दिल्याबद्दलही चौकशीची टांगती तलवार भुजबळ यांच्या शिरावर आहे. चमणकर यांनी १०० कोटी रुपयांचे महाराष्ट्र सदन व हायमाउंट बांधून द्यायचे व त्या बदल्यात त्यांनी अंधेरी येथील आरटीओचा मोक्याच्या ठिकाणी असलेला भूखंड विकसित करायचा, असा प्रस्ताव भुजबळ यांनी मंजूर करवून घेतला. या संपूर्ण व्यवहारात चमणकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला १०० कोटी रुपयांची कामे करून दिली; मात्र प्रत्यक्षात अंधेरीच्या भूखंड विकासात चमणकर यांना १० हजार कोटी रुपयांचा नफा करवून दिला, अशी तक्रार आहे. कॅगने या निर्णयाबद्दल भुजबळ यांना दोषी धरले. त्याचबरोबर विधिमंडळाच्या लोकलेखा समितीने चमणकर यांना १०० कोटी रुपयांच्या या कामात विकासकाला ६ हजार २६४ कोटी रुपयांचा नफा झाल्याचा ठपका ठेवला होता. मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली तेव्हा न्यायमूर्तींनीही महाराष्ट्र सदनाच्या उभारणीमधील हा घोटाळा अत्यंत गंभीर असून, त्याची चौकशी करण्याचे आदेश दिले.
महाराष्ट्र सदनाच्या उभारणीत जसा घोटाळा झाला तसाच या सदनातील फर्निचरच्या खरेदीत गैरव्यवहार झाला.
भुजबळ यांच्या एमईटी कंपनीमधील कर्मचाऱ्यांच्या नावे एक बेनामी कंपनी स्थापन करून फर्निचर खरेदीचे कंत्राट त्या कंपनीला मिळाल्याचे दाखवले गेले. त्यानंतर त्या बेनामी कंपनीने हे काम भुजबळ यांचे पुत्र पंकज व भाचे समीर यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या कंपनीला हस्तांतरित केल्याचे दाखवण्यात आले, अशी तक्रार आहे. (विशेष प्रतिनिधी)

सक्तवसुली संचालनालयाचाही ससेमिरा लागणार
भुजबळ यांनी नाशिक शहराच्या वेशीवर आर्मस्ट्राँग या आपल्या कंपनीचा ग्रीन एनर्जीचा प्लान्ट उभारला. अल्पकाळाकरिता कार्यरत असलेल्या या कंपनीचे १० रुपये दर्शनी मूल्याचे समभाग मुंबई, कोलकाता येथील काही कंपन्यांनी १० हजार रुपयांना खरेदी केल्याचे दाखवून काळा पैसा पांढरा केला.
तसेच आर्मस्ट्राँग कंपनीकरिता इंडोनेशियात कोळशाच्या खाणी खरेदी केल्या, अशा तक्रारी खासदार किरीट सोमैया यांनी सक्त वसुली संचालनालयाकडे केलेल्या आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानंतर ही चौकशी सुरू व्हावी, याकरिता पाठपुरावा सुरू आहे.

Web Title: In the Bhujbal crisis with flashy figures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.