भुजबळ कुटुंबीयांची चौकशीला टाळाटाळ?
By Admin | Published: February 24, 2015 04:31 AM2015-02-24T04:31:13+5:302015-02-24T04:31:13+5:30
महाराष्ट्र सदनसह अनेक घोटाळ्यांप्रकरणी लाचलुपत प्रतिबंधक विभागाने(एसीबी) सुरू केलेल्या उघड चौकशीला भुजबळ कुटुंबीय गैरहजर राहण्याचे सत्र सुरू झाले आहे.
मुंबई : महाराष्ट्र सदनसह अनेक घोटाळ्यांप्रकरणी लाचलुपत प्रतिबंधक विभागाने(एसीबी) सुरू केलेल्या उघड चौकशीला भुजबळ कुटुंबीय गैरहजर राहण्याचे सत्र सुरू झाले आहे. कारण पंकज भुजबळ यांच्यापाठोपाठ समीर हेही चौकशीला गैरहजर होते. त्यामुळे भुजबळ कुटुंबीय ही चौकशी टाळण्याच्या प्रयत्नात तर नाहीत ना, अशी चर्चा सुरू झाली आहे.
राष्ट्रवादीचे नेते व माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे समीर यांच्यापासून एसीबीच्या विशेष तपास पथकाने(एसआयटी) उघड चौकशी सुरू केली. गेल्या आठवड्यात शुक्रवारी समीर यांची एसआयटीने एसीबीच्या वरळी येथील मुख्यालयात तब्बल तीन तास कसून चौकशी केली. त्यांचा जबाबही नोंदवून घेतला. मात्र चौकशी अपूर्ण राहिल्याने त्यांना सोमवारी मुख्यालयात हजर राहण्याची ताकीद देण्यात आली होती. मात्र आज दिवसभरात समीर एसीबीच्या मुख्यालयात फिरकलेच नाहीत.
त्याआधी शनिवारी एसीबीने भुजबळ यांचे पुत्र पंकज यांना चौकशीसाठी बोलावले होते. मात्र नाशिक येथे होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभ मेळाव्याच्या आयोजनाबाबत एका बैठकीचे निमित्त पुढे करून शनिवारी चौकशीसाठी उपस्थित राहता येणार नाही, असे एसआयटीला कळविले होते. त्यामुळे एसीबीने त्यांना पुढील तारीख दिली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या आठवड्यात पंकज यांची चौकशी होऊ शकते. (प्रतिनिधी)