भुजबळ कुटुंबीयांच्या अडचणींत आणखी वाढ

By admin | Published: July 14, 2017 05:42 AM2017-07-14T05:42:53+5:302017-07-14T05:42:53+5:30

सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांचा मुलगा पंकज आणि पुतण्या समीर भुजबळ यांच्यासह १७ जणांविरुद्ध एसीबीने गुरुवारी गुन्हा दाखल केला

Bhujbal family's problems further increase | भुजबळ कुटुंबीयांच्या अडचणींत आणखी वाढ

भुजबळ कुटुंबीयांच्या अडचणींत आणखी वाढ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : खोटी कागदपत्रे सादर करून, ओशिवरा येथे अवैधरीत्या व्यावसायिक संकुल उभारून भूखंड लाटल्याप्रकरणी माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांचा मुलगा पंकज आणि पुतण्या समीर भुजबळ यांच्यासह १७ जणांविरुद्ध एसीबीने गुरुवारी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे भुजबळ कुटुंबीयांच्या अडचणींत आणखी वाढ झाली आहे. या प्रकरणात अद्याप कुणालाही अटक केलेली नाही. तथापि, एसीबीच्या पथकाने या इमारतीवर छापा टाकून महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत.
पंकज आणि समीर यांच्याव्यतिरिक्त यामध्ये सुरेश करांडे, सुभाष सोनावणे, उत्तम पत्रोजी खोब्रागडे, श्यामसुंदर शिंदे या चार तत्कालीन आयएएस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. भुजबळ कुटबीयांविरुद्ध दाखल झालेला हा सहावा गुन्हा आहे. महाराष्ट्र सदन घोटाळा आणि ३०० कोटी रुपयांची बेनामी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी एसीबी, ईडी तसेच प्राप्तीकर विभागाकडून भुजबळ कुटुंबीयांवर कारवाई करण्यात येत आहे. या गुन्ह्यांत छगन भुजबळ आर्थर रोड कारागृहात आहेत.
एसीबीच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, भावेश बिर्ल्डस प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक असलेले पंकज आणि समीर यांच्यासह १७ आरोपींनी म्हाडा अधिकाऱ्यांच्या मदतीने कट रचून खोटी कागदपत्रे सादर केली. याच कागदपत्रांच्या आधारे ओशिवरा येथे ओशिवरा तुळशी सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करून त्याआधारे भूखंड मिळविला. या भूखंडावर निवासी सोसायटी स्थापन केली. त्यानंतर त्यांनी या जागेवर व्यावसायिक संकुल उभारल्याची धक्कादायक माहिती समोर आली. तपासात ही बाब समोर येताच गुरुवारी एसीबीने पंकज आणि समीर भुजबळ यांच्यासह १७ जणांविरुद्ध फसवणूक, कट रचणे, तसेच इतर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यातील संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
एसीबीने ओशिवरा तुळशी सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या कार्यालयावरही छापे घातले. तेथून महत्त्वपूर्ण दस्तावेज ताब्यात घेतले असून याप्रकरणातील अन्य पुरावेही गोळा करण्यास एसीबीने सुरुवात केली आहे. या प्रकरणात पंकज आणि समीर भुजबळ यांनी या संस्थेला आर्थिक मदत केली. त्यातून कोट्यवधींचा नफा मिळवला. त्या दिशेने एसीबी अधिक तपास करत आहे.
>असा लाटला भूखंड
तुळशी गृहनिर्माण सहकारी संस्थेचे मुख्य प्रवर्तक सावंत यांच्यासह सय्यद, वाळूंज, पारकर, पराडकर आणि मुजाहीद यांनी याप्रकरणातील साक्षीदारांच्या नावाने कागदपत्रे गोळा केली. तसेच साक्षीदारांच्या खोट्या सह्या करून त्याआधारे बनावट दस्तावेज तयार केले आणि याच बनावट दस्तावेजांच्या मदतीने तुळशी गृहनिर्माण सहकारी संस्था स्थापन करून, महाराष्ट्र शासनाची फसवणूक करत निवासी भूखंडाचे वाटप करून घेतले.
मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे तत्कालीन मुख्य अधिकारी कारंडे यांच्यासह श्रृंगारपुरे आणि देशमुख यांनी गृहनिर्माण संस्थेतील सभासदांची तसेच कागदपत्रांची पडताळणी न करताच त्यांना पात्र ठरवून दाखला दिला. तर मुंबई मंडळाचे तत्कालीन मुख्य अधिकारी शिंदे यांच्यासह खोब्रागडे, वेलिंग, गौतम, सोनावणे आणि मंडलेकर यांनी बेकायदेशीरपणे शासनाकडून मिळालेल्या भूखंडाच्या निवासी वापरामध्ये आधी अंशत: आणि त्यानंतर
संपूर्ण असे अनिवासी वापरासाठी बदल घडवून भूखंड लाटला.
>हे आहेत आरोपी
पंकज छगन भुजबळ भावेश बिर्ल्डस प्रा.लि.चे संचालक, समीर मगन भुजबळ भावेश बिर्ल्डस प्रा. लि. संचालक, प्रशांत जगन्नाथ सावंत (तुळशी गहनिर्माण सहकारी संस्था, मुख्य प्रवर्तक), मुन्ना अब्दुल सय्यद (सचिव), अजित वसंत वळूंज (सभासद), तुकाराम गोविंद पारकर (सभासद), संजय पराडकर (स्थानिक रहिवासी - मयत), ताजुद्दिन मकदुमअली मुजाहीद (म्हाडा प्राधिकरण तत्कालीन सदस्य), शिरिष मनोहर श्रृंगारपुरे (तत्कालीन भूमापक), सूर्यकांत शंकरराव देशमुख (तत्कालीन सहायक भू व्यवस्थापक), सुरेश कारंडे (तत्कालीन मुख्य अधिकारी - मुंबई गहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ), श्यामसुंदर शिंदे (तत्कालीन मुख्य अधिकारी, मुंबई मंडळ). संजयसिंह गोपालसिंह गौतम (तत्कालीन सहमुख्याधिकारी, मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ), उत्तमपत्रोजी खोब्रागडे (तत्कालीन उपाध्यक्ष तथा मुख्य अधिकारी महाराष्ट्र गहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण), सुभाष ओमाना सोनावणे (तत्कालीन मुख्य अधिकारी मुंबई गहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ), दीपक मंडलेकर (तत्कालीन म्हाडा प्राधिकरणातील नियोजन विभागाचे मुख्य वास्तुशास्त्रज्ञ - मयत) आणि इतर.

Web Title: Bhujbal family's problems further increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.