भुजबळांवर महिन्याभरात आणखी एक आरोपपत्र
By admin | Published: February 26, 2016 02:10 AM2016-02-26T02:10:41+5:302016-02-26T02:10:41+5:30
माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ व त्यांच्या कुुटुंबीयांविरोधात कलिना सेंट्रल लायब्ररीप्रकरणी एका महिन्यातच आरोपपत्र दाखल करण्यात येईल, अशी माहिती
मुंबई : माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ व त्यांच्या कुुटुंबीयांविरोधात कलिना सेंट्रल लायब्ररीप्रकरणी एका महिन्यातच आरोपपत्र दाखल करण्यात येईल, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुरुवारी उच्च न्यायालयाला दिली.
महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी बुधवारी छगन भुजबळ व त्यांच्या कुटुंबीयांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले, तर गुुरुवारी नवी मुंबईच्या ‘हेक्स वर्ल्ड’ घोटाळाप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी त्यांच्यावर आरोपपत्र दाखल केले. आता कलिना विद्यापीठातील राज्य सरकारच्या सेंट्रल लायब्ररीप्रकरणी एका महिन्यात आरोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याची माहिती, गुरुवारी
एसीबीने न्या. व्ही. एम. कानडे व न्या. रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठाला दिली.
कलिना विद्यापीठाचा भूखंड हडप केल्याची केस गंभीर असून, याचा संपूर्ण तपास करण्यासाठी व भुजबळ आणि कुुटुंबीयांवर आरोपपत्र दाखल करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागेल, अशी माहिती एसीबीच्या वकिलांनी खंडपीठाला दिली. त्यावर खंडपीठाने एसीबीला एक महिन्याची मुदतवाढ दिली.
एसीबीच्या म्हणण्यानुसार, संबंधित भूखंड मुंबई विद्यापीठाचा होता. मात्र, या भूखंडावर लायब्ररी बांधण्याचे कंत्राट खासगी विकासकाला देण्यात आले. यासाठी भुजबळ यांना मोठ्या रकमेची लाच देण्यात आली.
भुजबळ व त्यांच्या कुटुंबीयांच्या बेहिशेबी मालमत्तेची आणि भूखंड हडप केल्याची चौकशी करून, त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आम आदमी पार्टीच्या अंजली दमानिया आणि प्रीती मेनन यांनी जनहित याचिकेद्वारे केली आहे. (प्रतिनिधी)