भुजबळ-सदाभाऊ खोत यांच्यात झोपा काढण्यावरून खडाजंगी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 02:54 AM2019-06-21T02:54:57+5:302019-06-21T02:55:13+5:30
नाशिकच्या टर्मिनल मार्केटचा प्रश्न अखेर राखून ठेवला
मुंबई : २००९पासून पाच वर्षे तुमचे सरकार होते तेव्हा नाशिकच्या टर्मिनल मार्केटबाबत ते झोपा काढत होते का, असा सवाल पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी माजी उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांना केला. त्यावर, संतप्त झालेल्या भुजबळांनी, तुम्ही विधानसभा, विधान परिषदेत या विषयावर वेगवेगळी उत्तरे दिली तेव्हा झोपा काढत होते का, असा प्रतिसवाल केला. शेवटी उपाध्यक्ष विजय औटी यांनी या बाबतचा प्रश्न राखून ठेवला.
नाशिक तालुक्यातील पिंप्री सय्यद येथे हे टर्मिनल मार्केट उभारण्याचा निर्णय २००९ मध्ये घेण्यात आला होता. त्यासाठी १०० एकर जागा कृषी पणन महामंडळास देण्यास नगरविकास विभागाने अनुमतीही दिली आहे. तसे उत्तर याच सरकारने २०१७ मध्ये विधान परिषदेत दिलेले होते. असे असताना आता नगरविकास विभागाशी चर्चा करावी लागेल, विभागीय आयुक्तांचा अहवाल मागवू अशी उडवाउडवीची उत्तरे राज्यमंत्री देत असल्याची टीका भुजबळ यांनी केली. या जागेचे शैक्षणिक आरक्षण बदलावे लागेल, त्यासाठी आयुक्तांचा अहवाल मागविला असल्याचे खोत म्हणाले. महसूल व नगरविकास विभागाशी आठ दिवसांत चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन खोत यांनी दिले.
मात्र, या उत्तराने समाधान न झालेले भुजबळ यांनी हा प्रश्न राखून ठेवण्याची मागणी केली. भुजबळ-खोत यांच्यातील खडाजंगीमध्ये मध्यस्थी करीत वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रश्न राखून ठेवण्याची केलेली विनंती उपाध्यक्ष औटी यांनी मान्य केली.